मुख्यमंत्री शिंदे जागावाटपावर स्पष्टीकरण देताना कोल्हापूर CM Eknath Shinde:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला अवघ्या नऊ जागा मिळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांनी मुंबईतील बैठकीवेळी याबाबतचे संकेत दिले आहेत. यानंतर आज (8 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायंकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. यापूर्वी कोल्हापुरात बोलताना "महायुतीमध्ये योग्य समन्वय आहे, चिंता नसावी", असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिलं.
महायुतीत जागांचा पेचप्रसंग :महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जिंकलेल्या 13 पैकी 9 जागा मिळणार अशी चर्चा राज्यभर सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा केली आणि यानंतर आता या चर्चांना उधाण आलं आहे. महायुतीमधील घटक पक्षांनीही आम्हाला योग्य सन्मान मिळावा, अशी मागणी केली आहे. यामुळे महायुतीतील जागांचा पेचप्रसंग पाहायला मिळत आहे. कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे दोन खासदार आहेत; परंतु कोल्हापुरात दोन्हीही उमेदवारांचा पत्ता कट होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महिला दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमात सहभाग :भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोन्ही जागांवर दावा केल्यानं मुख्यमंत्री शिंदेसमोर जागा कायम ठेवायचं आव्हान उभं ठाकलं आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता कोल्हापुरात दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण कार्यक्रमात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांशी संवाद साधला. महिलांना सन्मान देणारं हे सरकार आहे. आता स्त्री अबला नसून सबला आहे, असं म्हणत स्त्रीशक्तीचा जागर केला.
माणगावातील ऐतिहासिक स्मारकाचे लोकार्पण :1920 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी माणगाव येथील पहिल्या अस्पृश्य परिषदेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे नेतृत्व करतील असं भाकीत केलं होतं. या ऐतिहासिक भूमितच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडन येथील घराची प्रतिकृती साकारली आहे. या स्मारकाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आले काळे झेंडे :गतवर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन १०० रुपयांचा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वडगाव हातकणंगले रोडवर काळे झेंडे दाखविण्यात आले. राज्य सरकारनं दोन महिन्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर १०० रुपयांचा दुसरा हप्ता जमा करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी स्वत: मध्यस्थी करून पुणे-बंगळुरु महामार्गावरील आंदोलन स्थगित केलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी १०० रुपये ऊसदरवाढ देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे; मात्र राज्य सरकार ऊसदर नियंत्रण समितीची बैठक घेऊन मान्यता न दिल्यानं कारखान्यांना दुसरा हप्ता देणं अडचणीचं झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी पोकळ वल्गना करू नये, कारखानदारांना पाठीशी घालू नका. ठरल्याप्रमाणे गत हंगामातील दुसरा हप्ता १०० रुपये तातडीनं द्या, अशा आशयाचे फलक दाखविण्यात आले.
हेही वाचा:
- तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटील यांच्या आदेशानुसार वकील म्हणून नियुक्ती, किशोर भालेरावांना न्यायालयाचा दिलासा
- मराठा आरक्षणावरुन मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश; आरक्षणावर पुन्हा प्रश्नचिन्ह
- Womens Day 2024 : एचआयव्ही बाधित असूनही शालिनीताई बनल्या आधारवड, वाचा प्रेरणादायी स्टोरी