नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, "वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही अशी जागा आहे, जिथे जगातले सगळे बिजनेस लीडर्स आणि पॉलिटिकल लीडर्स एकत्र येतात. या ठिकाणी मोठया प्रमाणात नेटवर्किंग तर होतंच, विचारांचं आदान प्रदान देखील होते. मोठ्या प्रमाणात इन्वेस्टमेंट नेटवर्किंग होते, त्या दृष्टीने मी दावोसला चाललो आहे. अनेक महत्त्वपूर्ण बैठकी ठरलेल्या आहेत. अनेक बिझनेस लीडर आणि वर्ल्ड लीडरसोबत बैठकी ठरलेल्या आहेत. मला विश्वास आहे की तिथे चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यास आम्ही यशस्वी होऊ,"
दिल्लीत भाजपची सरकार येईल : दिल्ली येथील जनतेचा केजरीवाल यांच्यावरील विश्वास उठलेला आहे. दिल्लीचे नागरिक मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार दिल्लीत आणणार आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांबाबतही भाष्य केलं. लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा होईल, आमचं काम शेवटच्या टप्प्यात आलं आहे.
तपास यंत्रणा रोज माहिती सांगू शकत नाही :सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास यंत्रणांना नीटपद्धतीनं करू दिला पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. "सर्व गोष्टी तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाहीत. तपासामध्ये सर्व गोष्टी गोपनीयता ठेवून तपास केला जातो. त्यामुळे मला असं वाटत की तपास यंत्रणावर दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे. मी निश्चितपणे सांगतो कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही. तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहेत."