मुंबई Dinesh Lad Exclusive Interview : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या टी 20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं दक्षिण आफ्रिकेला नमवत टी 20 विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं आणि सगळ्या देशात एकच जल्लोष पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून भारतीय क्रिकेट संघाचं तोंड भरुन कौतुक करण्यात आलं. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या बालपणीचे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी देखील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे. क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्यासोबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
दिनेश लाड (ETV Bharat Reporter) माझ्याकडं शब्द नाहीत, रोहितनं जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनवलं : "माझ्याकडं आता शब्द नाहीत. रोहितनं मला जगातील सर्वात श्रीमंत माणूस बनवलं असून सर्वात मोठी गुरुदक्षिणा दिल्याच्या भावाना दिनेश लाड यांनी व्यक्त केल्या. लहानपणी ज्या मुलाला मी खेळताना बघितलं, तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आणि टी 20 क्रिकेट विश्वचषक जिंकलं. मलाच नाही, तर 130 कोटी भारतीयांना त्यानं खुश केलं. याच्यासारखा आनंद दुसरा कोणताही नाही," असं त्यांनी म्हटलं.
भारत विश्वचषकाचा दावेदार : "विश्वचषकातील अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेत रंगला. मात्र हा सामना एकतर्फी न होता काट्याची टक्कर पाहायला मिळाली, हे अगदी सत्य आहे. यात भारतीय क्रिकेट संघातील विराट कोहलीचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. काल देखील मी अनेक वृत्तवाहिनींमध्ये बोलताना म्हणालो होतो की, विराट कोहली यांची खेळी सर्वात मोठी होईल आणि त्यासोबत शिवम दुबे विषयी देखील मी म्हणालो होतो. त्याप्रमाणं माझा अंदाज खरा ठरला, याचा मला आनंद आहे. सामन्यात एका वळणावर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज क्लासेन सामना आपल्याकडं वळण्यात यशस्वी होईल, असं वाटत लागलं होतं. मात्र त्याची विकेट हार्दिक पांड्यानं काढली आणि आपल्या बुमराह, अर्शदीप आणि हार्दिक यांनी चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आणि टीममधील सर्वच खेळाडूंनी योगदान देऊन भारतीय संघाला यश मिळवून दिलं," असं लाड यांनी सांगीतलं.
मॅचचा टर्निंग पॉईंट कोणता : "विश्वचषकातील अंतिम सामन्याचा टर्निंग पॉईंट कोणता, असं दिनेश लाड यांना विचारलं असता ते म्हणाले, "क्लासेनची विकेट होती, बुमराहचं 18वं षटक त्यानंतर अर्शदीपचं 19वं षटक या गोष्टी मॅचसाठी महत्वाचे टप्पे म्हणता येतील. मात्र सूर्यकुमार यादवनं घेतलेला झेल, तो झेल त्यानं घेतला नसता, तर हा सामना आपण हरलो असतो आणि पुन्हा एकदा डेव्हिड मिलर समोर असता. त्यामुळं त्याचा फटका भारताला निश्चित बसला असता. म्हणून सूर्यकुमार यादवनं घेतलेला झेल टर्निंग पॉईंट होता," असं दिनेष लाड यांनी म्हटलं आहे.
येणारा क्रिकेट विश्वचषक जिंकण महत्त्वाचं : भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा हे टी 20 प्रकारामधून निवृत्त होत आहेत. याविषयी बोलताना दिनेश लाड म्हणाले, "ही चांगली गोष्ट आहे. निवृत्ती अगदी योग्य पद्धतीनं घेतली आहे. त्यांना आता आगामी क्रिकेट विश्वचषकासाठी तयारीवर लक्ष केंद्रित करायचं आहे." आगामी क्रिकेट विश्वचषकाच्या संघाच्या कर्णधार आणि भारतीय प्रशिक्षक पदी कोण असावं, या प्रश्नाला उत्तर देताना दिनेश लाड म्हणाले, "याविषयी मी भाष्य करु शकत नाही, कारण की ते माझ्या हातात नाही. याबाबतचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार हा भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या (BCCI) हातात असतो, त्यामुळं त्यावर मी भाष्य करणार नाही. येणारा क्रिकेट विश्वकप जिंकणं भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. क्रिकेट विश्वचषकानं भारताला अनेक वेळा हुलकावणी दिली आहे. मला असं वाटतं की भारतीय संघाकडून रोहित शर्मा खेळेलं आणि तो भारतासाठी क्रिकेट विश्वचषक जिंकून आणेल. पुन्हा एकदा 130 करोड भारतीयांना खुश करेल," असा विश्वास क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
- टी 20 क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाचा दावेदार कोण? रोहित शर्माचे कोच दिनेश लाड म्हणाले... - Dinesh Lad Exclusive
- Dinesh Lad : 'रोहितला १३० कोटी जनतेचा आशीर्वाद, भारत वर्ल्डकप जिंकणारच'; रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांच्याशी खास बातचित