ठाणे :विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी आता जोरदार सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री कळवा मुंब्रा इथं सभा घेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना निवडून देण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी नागरिकांना केलं. कळवा मुंब्र्यातील बंटीची 'घंटी' वाजवणार असा जोरदार प्रहार त्यांनी यावेळी केला.
मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारार्थ कळवा नाका इथं आयोजित केलेल्या जाहीर सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, दशरथ पाटील, आनंद परांजपे, राजन किणे, उमेदवार नजीब मुल्ला तसेच राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, रिपाईचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कळवा मुंब्र्यातील बंटीची 'घंटी' वाजवणार :"नगरसेवकानं काम केलं तरी बोर्ड आमदाराचा, असे कारनामे इथल्या आमदारानं केले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तब्बल साडेतीन हजार कोटीचा निधी दिला. मात्र तरीही निधी मिळाला नसल्याची बोंब मारतो. तेव्हा, नजीब मुल्ला हा कोकणी पोरगा मराठी आहे. त्यालाच बहुमतानं निवडून देत इथल्या बंटीची घंटी वाजवायची," असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
धर्मवीर आनंद दिघेंचा बालेकिल्ला म्हणजे ठाणे जिल्हा :मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "धर्मवीर आनंद दिघेंचा बालेकिल्ला म्हणजे ठाणे जिल्हा आहे. ठाणे महापालिका गाजवणाऱ्या नजीब मुल्ला या उमेदवाराला आता विधानसभा गाजवण्यासाठी पाठवायचं आहे. तुम्हाला निधीची कमतरता पडु देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. "मनिषानगरचा पुर्नविकास करु, तुम्ही एक दिवस त्याच्यासाठी काढा. नजीब मुल्लाच्या पाठीशी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस खंबीरपणे उभे आहेत. तेव्हा, मुंब्रा - कळवा विभागाच्या विकासाची जबाबदारी आम्ही घेतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसमुदायाला दिली. यावेळी नजीब मुल्ला यांच्या जाहिरनाम्याचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं.
हेही वाचा :
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रामदास आठवले यांच्या बॅगांसह हेलिकॉप्टरची तपासणी; पाहा व्हिडिओ
- "मी कॉमनमॅन सर्वसामान्यांना बनवणार सुपरमॅन"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
- कोविडच्या काळात पैसे खाल्लेल्यांच्या बॅगा होतात चेक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला