मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Malvan : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राजकारण तापलंय. "याबाबत जे राजकारण करत आहेत तो त्यांचा खुजेपणा आहे," असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. तसेच या जागेवर नौदलाच्या मदतीनं पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा अखंड पुतला उभारण्यात येईल, असंही ते म्हणाले. जे स्वराज्यावर चालून येतील त्यांचा कोथळा बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter) आशिष शेलारांनी मागितली माफी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी अखेर भाजपाचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या वतीनं जनतेची माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावर रान पेटवायला सुरुवात केल्यानंतर हा मुद्दा कदाचित आगामी निवडणुकीत त्रासदायक ठरू शकतो हे लक्षात आल्यानंतर सत्ताधारी पक्षानं अखेर या प्रश्नी नमती भूमिका घेतली असं बोललं जातंय.
जनतेच्या भावनांचा मान राखू : "मला कुठलेही राजकीय भाष्य करायचं नाही. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. क्लेशदायक आहे. संपूर्ण महाराष्ट्राला यामुळं त्रास झाला आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे. या संदर्भात नेमकं काय झालं, कोण याच्यामध्ये दोषी आहे याबाबतची चौकशी होईलच, त्यात जे सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. मात्र, या प्रकरणी आपण राज्यातील सर्व जनतेची राज्य सरकारच्या वतीनं माफी मागतो. ही घटना निश्चितच दुःखदायक आहे. मात्र, छत्रपती शिवरायांचा अधिक चांगला पुतळा आम्ही त्या ठिकाणी निश्चितच उभारू, आणि राज्यातील जनतेच्या भावनांचा मान राखू," असं म्हणत आशिष शेलारांनी जनतेची माफी मागितली.
छत्रपतींचा मावळा फोटो व्हायरल करणार नाही : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर यावर राजकारण सुरू असून, पुतळ्याचे विचित्र असे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा खाली आला ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत दुःखद अशी घटना आहे. या घटनेमुळं सर्वांच्या मनाला वेदना झाल्या. मात्र, यावर जे राजकारण सुरू आहे ते अतिशय वेदनादायी आहे. या घटनेनंतर छत्रपतींचा जो मावळा आहे, तो अशा पद्धतीचे फोटो कधीच व्हायरल करणार नाही. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारनं हा पुतळा तयार केला नव्हता. तर नौदलानं चांगल्या हेतूनं हा पुतळा तयार केला होता."
अमोल मिटकरींची पोस्ट : "महाराज माफ करा! कुण्या तोंडानं माफी मागावी? महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजाचा पुतळा असा कोलमडून पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय. मात्र, ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडानं माफी मागावी," अशी पोस्ट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी 'एक्स'वर शेयर केली.
विरोधकांवर टीका : नौदलानं ज्यांना पुतळा उभारण्याचं काम दिलं, त्यांना इतक्या वेगानं येथे सोसाट्याचे वारे वाहतात हे समजलं नसेल. त्याचं आकलन त्यांना करता आलं नाही. तसंच अशा ठिकाणी जेव्हा आपण पुतळा बसवतो तेव्हा त्यातील लोखंड हे समुद्राच्या वाऱ्यानं लवकर गंजतं, याचंही नीट आकलन केलं होतं की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये सर्व चौकशी सुरू आहे. आमचा संकल्प आहे की त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य व अखंड असा पुतळा आम्हाला तयार करायचा आहे. आम्ही नौदलाच्या मदतीनं त्या ठिकाणी असा भव्य पुतळा पुन्हा एकदा बसवू. यावर कोणीही राजकारण करू नये," अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून व्यक्त केली. यावर जर राजकारण कोण करत असेल तर तो अक्षरशः खुजेपणा आहे, असं म्हणत विरोधकांवर टीका केली.
लोकशाही पद्धतीनं कोथळा बाहेर काढू : दहीहंडीचा उत्साह सर्वत्र जोमात सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे मुंबई व ठाणे परिसरातील विविध दहीहंडी उत्सवांना भेटी देत आहेत. वरळी येथील जांबोरी मैदान येथे भाजपानं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला फडणवीस यांनी भेट दिली. "दहीहंडीमध्ये गोविंदा पथकानं अतिशय सुंदर असा अफजलखान वधाचा देखावा सादर केला. हा देखावा बघून आमच्या अंगावरसुद्धा रोमांच उभे राहिले. यातून हेच सांगायचं आहे की, अफजलखान रुपी कितीही शक्ती स्वराज्यावर चालून आल्या तरी छत्रपतींच्या प्रेरणेनं त्यांचा कोथळा आम्ही लोकशाही पद्धतीनं बाहेर काढू," अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना इशारा दिला.
हेही वाचा
- पंतप्रधान मोदी जिथं हात लावतात तिथं माती होते; संजय राऊतांचा हल्लाबोल म्हणाले 'महाराजांचा पुतळा पाहून काळजात चर्रर झालं' - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
- "शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले भक्कमपणे उभे, पण..." महाविकास आघाडीचा महायुतीवर निशाणा - statue of chhatrapati shivaji
- वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा पराभव करण्याकरिता महायुतीची रणनीती, मनसेसह अमोल मिटकरींचा होणार सामना? - Vidhan Sabha Elections 2024