पुणे- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) देशभरात उत्साहानं साजरी करण्यात येत आहे. जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर आज शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहिले आहेत.
Live Updates-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमानं आणि दूरदर्शी नेतृत्वानं स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत."
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांना मानवंदना व्यक्त केली. यावेळी ते बोलताना म्हणाले, " किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात येणार आहेत. छत्रपतींचे १२ किल्ले जागतिक वारसास्थळे घोषित करण्यासाठी सादरीकरण करण्यात येणार आहे. शिवराय हे उत्तम प्रशासक होते. त्यांनी मावळ्यांची फौज तयार केली. आपल्या देशाच्या पाठीशी शिवरायांची प्रेरणा आहे. त्यांचे गडकिल्ले कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. गडकिल्ले हे जागतिक वारसा होणार आहेत."
- शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा सुरू आहे.
- शासकीय मानवंदना देण्यात आली आहे.
- मुधाळने येथील जिल्हा परिषदेच्या मुलांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवचरित्र सादर केलं
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत छत्रपतींना अभिवादन केलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, भारताच्या श्रद्धेचे आणि अस्मितेचे रक्षक, 'हिंदवी स्वराज्याचे' संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना आदरांजली अर्पण करतो! त्यांनी धर्म, संस्कृती आणि प्रतिष्ठेसाठी दिलेले बलिदान आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणा देईल.