महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आग्र्यातून छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी सुटका कशी झाली? इतिहासात 'अशी' आहे नोंद - CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ HISTORY

खरंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्यातून झालेली सुटका ही भारतीय इतिहासातील अद्वितीय अशी घटना आहे. याबाबत वाचा सविस्तर अशी ऐतिहासिक माहिती.

chhatrapati shivaji maharaj history
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा सुटका (Source- ETV Bharat Reproter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2025, 11:16 AM IST

Updated : Feb 11, 2025, 11:27 AM IST

अमरावती -छत्रपती शिवाजी महाराज यांची आग्र्यातून झालेल्या सुटके संदर्भात अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानामुळं सध्या वाद निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या साम्राज्याला छेद देत स्वतःची सुटका नेमकी (Chhatrapati Shivaji Maharaj history) कशी करून घेतली? या संदर्भात इतिहासाचे जाणकार आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील छत्रपती शिवाजी थॉट्स या अभ्यासक्रमाचे प्राध्यापक डॉ. वैभव मस्के यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना विशेष अशी माहिती दिली.



छत्रपती शिवाजी महाराजांचं आग्र्याला जाण्याचं कारण-1665 मध्ये मिर्झा राजे जयसिंह हा छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आला. त्यावेळी पुरंदरच्या लढाईत मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आलं. महाराजांचे अनेक सैनिक या लढाईत मारले जात होते. यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंह याच्यासोबत 11 जून 1665 रोजी ऐतिहासिक असा पुरंदरचा तह अर्थात करार केला. या कराराचा भाग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांच्या वतीनं आदिलशाही विरुद्ध लढावं असं ठरलं.

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा सुटका (Source- ETV Bharat Reporter)

अखेर आग्र्याला जाण्याचा घेतला निर्णय-छत्रपती शिवाजी महाराज मोगलांच्या वतीनं आदिलशाही विरुद्ध लढले. मात्र, दुर्दैवानं त्यांना अपयश आलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमा फसू लागल्यानं मिर्झाराजे जयसिंह यांना औरंगजेबानं खरमरीत पत्र पाठवलं. औरंगजेबाचा आपल्यावर असणारा रोष पाहता मिर्झाराजे जयसिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा मुलगा संभाजी महाराज यांना भविष्यात आग्र्याला आपल्या भेटीसाठी पाठवण्याचा शब्द औरंगजेबाला दिला. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला जाण्यास तयार नव्हते. मात्र, आग्रा भेटीच्या निमित्तानं मुघलांचा कारभार आपल्याला पाहता येईल. नर्मदा नदी पलीकडला भारत पाहता येईल. भविष्यातील राजकारण समजून घेण्याच्या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जाण्याचा निर्णय घेतला.



औरंगजेबानं केली एक लाख रुपयांची व्यवस्था-मिर्झाराजे जयसिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांना कुठलाही त्रास होणार नाही, असा शब्द औरंगजेबाकडून घेतला. औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रवास खर्चासाठी एक लाख रुपयांची व्यवस्था केली. मार्गात सुभेदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत करावं, असा फर्मान औरंगजेबानं काढला होता. या संदर्भात औरंगजेबाचं पत्र उपलब्ध असल्याचं प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी सांगितलं.


सुभेदाराकडून स्वागत करण्यास आधी नकार -छत्रपती शिवाजी महाराजांनी विशेष म्हणजे खबरदारी म्हणून आधीच 200 माणसं उत्तर भारतात पाठवली. ती वेशांतर करून उत्तर भारतात पोहोचली. महाराज 300 माणसं घेऊन सर्वात आधी औरंगाबाद अर्थात आजच्या छत्रपती संभाजी नगरात पोहोचलेत. त्या ठिकाणी औरंगजेबाचा सुभेदार सबशिखन खान यानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वागत करण्यास नकार दिला. यामुळं महाराज संतापले. त्यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला. नाईलाजानं सबशीखन खान हा समोर आला. त्यानं महाराजांचं स्वागत केलं.



आग्र्याला नेमकं काय घडलं-छत्रपती शिवाजी महाराज हे 11 मे 1666 रोजी आग्र्याला पोहोचले असताना नियोजनानुसार मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंह हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी समोर आला नाही. यामुळे महाराजांना हा आपला अपमान वाटला. त्यांना 300 माणसांसह एका सामान्य ठिकाणी ठेवण्यात आलं. हादेखील छत्रपती शिवाजी महाराजांना अपमान वाटला. दुसऱ्या दिवशी 12 मे 1666 ला औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता. यानिमित्त औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट ही 'दिवाने आम' या ठिकाणी ठरली. दिवाने आममध्ये बादशहा सर्वसामान्य जनतेला भेट द्यायचा.

अपमान झाल्यानं दरबारातून पडले बाहेर-आग्र्यात महाराजांच्या मोठ्या आख्यायिका पसरल्या होत्या. महाराजांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. यामुळं रामसिंह यांना छत्रपती शिवाजी महाराजांना गर्दीच्या मार्गानं न नेता खुश्कीच्या मार्गानं औरंगजेबाच्या दरबारात नेलं. वेळ झाल्यामुळं दिवाने आममधून औरंगजेब दिवाने खासमध्ये गेला. त्या ठिकाणी केवळ महत्त्वाच्या लोकांची तो भेट घ्यायचा. रामसिंह यानं छत्रपती शिवाजी महाराजांना दिवाने खासमध्ये नेलं. त्या ठिकाणी आपल्याला मराठ्यांचा शत्रू असणारा जसवंत सिंग राठोड याच्या मागे उभे करण्यात आल्याचं लक्षात येताच छत्रपती शिवाजी महाराज संतापले. त्यांनी रामसिंहाला आम्ही दख्खनचे राजे आहोत, असे सांगितलं. हे तुमचे वडील जाणतात. बादशहांनादेखील ठाऊक आहे, अशा शब्दात सुनावलं. राजाच्या दरबारातून छत्रपती बाहेर पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा वागण्यामुळं औरंगजेब संतापला. महाराजांचं नेमकं काय करावं, याबाबत औरंगजेबाला तीन ते चार दिवस कुठलाही निर्णय घेता आला नाही.



महाराजांनी घेतल्या महत्त्वाच्या भेटी-औरंगजेबाच्या दरबारातून बाहेर पडल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रामध्ये औरंगजेबाच्या दरबारातील वजीर आणि औरंगजेबाच्या मावशीचा पती जाफरखान याची भेट घेतली. जाफरखानच्या पत्नीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड राग होता. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या पत्नीचा भाऊ शाहिस्तेखानची बोटे लाल महालामध्ये छाटली होती. यावेळी शाहिस्तेखान बंगालच्या मोहिमेवर असल्यानं तो आग्र्याला उपस्थित नव्हता. यासोबतच महाराजांनी औरंगजेबाची बहीण जहाआराचीदेखील भेट घेतली. छत्रपतींनी लुटलेल्या सुरत शहरावर जहाआरा हिचा अधिकार होता. सुरत शहर लुटल्यानं तिचा छत्रपतींवर तीव्र रोष होता. असं असलं तरी महाराजांनी तिचीदेखील भेट घेतली. या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा काटा काढावा, असं तिला वाटत होतं. मात्र औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलाही त्रास होणार नाही, असा शब्द मिर्झाराजे जयसिंह याला दिला होता. त्यामुळे छत्रपतींचं नेमकं काय करावं, याबाबत औरंगजेब कुठलाही निर्णय घेत नव्हता.


छत्रपतींना काबुलला पाठवण्याची तयारी-छत्रपती शिवाजी महाराजांना मारावं, असं औरंगजेबाच्या दरबारातील प्रत्येकाला वाटायचं. त्यामुळं छत्रपतींच्या संरक्षणाकरिता रामसिंहाच्या सैन्याचा पहारा लावण्यात आला. रामसिंहाच्या सैन्यावर फौलद खानचा पहारा होता. त्या काळात आग्र्याला विठ्ठल दासाची हवेली तयार होणार होती. या हवेलीत छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा कट होता. यासोबतच राजअंदाज या क्रूर व्यक्तीसोबत काबुलला पाठवण्याचा आणि तिकडेच त्यांना ठार मारण्याचा विचार औरंगजेबाचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना रजअंदाजच्या कृरतेबाबत माहिती होती. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण आजारी पडलो, अशी अफवा पसरवली. त्यामुळे शिवरायांनी तिथून काही दिवस बाहेर न पडण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

अशी झाली सुटकेची तयारी-इतिहासातील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी रामसिंह यांच्याकडून 65 हजार रुपयांचे कर्ज घेतलं. या पैशातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आजारातून बरं होण्याकरिता मिठाई वाटण्याचा निर्णय घेतला. मिठाईचे पेटारे शिवाजी महाराजांच्या महालातून बाहेर जायला लागले. याचदरम्यान छत्रपतींनी आपल्या सोबत असणाऱ्या 300 सैनिकांना परत पाठवावे, असे पत्र औरंगजेबाला लिहिलं. औरंगजेबानं छत्रपतींची विनंती आनंदानं मान्य करीत 300 सैनिकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान रामसिंह यानं आपण छत्रपतींना जामीन राहणार नाही, असं औरंगजेबाला सांगितलं. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर रामसिंहाच्या सैन्याऐवजी फौलद खानासह त्याच्या सैन्याचा पहारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांजवळ मोजकीच माणसं राहणार होती.

आग्र्यातून सुटका ही इतिहासातील फार मोठी घटना-छत्रपतींना 18 ऑगस्ट 1666 ला विठ्ठलदासांच्या हवेलीत हलविण्याची तयारी सुरू झाली. 17 ऑगस्टला गोकुळाष्टमी होती. आग्रा शहरात गोकुळाष्टमीची धामधूम असल्यानं शहराच्या विविध भागात सैन्याचा पहारा लावण्यात आला. याचदिवशी छत्रपतींनी आग्र्यातून निसटण्याचा निर्णय घेतला. 17 जून 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्रातून निसटले. छत्रपतींच्या सेवेत असणारे हिरोजी फर्जंद आणि त्यांचा मुलगा हे महाराजांसाठी औषधांचा आणायचं आहे, असं सांगून बाहेर पडले. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटका ही भारतीय इतिहासातील फार मोठी घटना आहे. विशेष म्हणजे महाराजांनी रामसिंहाकडून घेतलेले 65 हजार रुपयांचे कर्ज इकडे जिजाबाईंनी मिर्झाराजे जयसिंग यांना परत करून फेडल्याचं प्रा. वैभव यांनी सांगितलं.

फौलद खान यानं दिली छत्रपतींच्या सुटकेची माहिती-छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पहारा ठेवण्याची जबाबदारी फौलद खान याच्यावर होती. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्यातून निसटून गेल्यावर आता आपली खैर नाही, असं फौलद खान याला वाटलं. छत्रपती शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेटार्‍यात लपून बाहेर पडलेत, असं फौलद खान यानंच सर्वात पहिल्यांदा सांगितलं. आपला कडेकोट पहारा असतानादेखील छत्रपती शिवाजी महाराज सुटले, हा फौलद खानसाठी मोठा धक्का होता.



डॉ. आंबेडकरांना वैदिक धर्माचं ठरवणं चुकीचं-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे छत्रपती शाहू कार्यावर आणि सयाजीराव गायकवाड यांच्या उदात्त ध्येयावर आधारित होतं. मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यावर 2 वर्ष 11 महिने 16 दिवस एवढा दीर्घकाळ त्यांनी भारतीय राज्यघटना लिहिली. सर्वांसाठी भारतीय राज्यघटना खुली ठेवून 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटनेला मान्यता मिळाली. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वधर्म समभावाच्या दृष्टिकोनातून या देशात लोकशाहीचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून कार्य केलं. असं असताना राहुल सोलापूरकर याचं डॉ
बाबासाहेब आंबेडकरांबाबतच वक्तव्य हे निषेधार्हच आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांना जाती आणि धर्मात न गुंफता त्यांचं महत्त्व आपण ओळखलं पाहिजे, असंदेखील प्रा. डॉ. वैभव मस्के म्हणाले.

हेही वाचा-

  1. “जीभ हासडली पाहिजे आणि गोळ्या घातल्या पाहिजेत”, राहुल सोलापूरकरच्या विधानावर उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया
  2. अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार? पाहा काय म्हणाले पुणे पोलीस आयुक्त
  3. राज्यातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पूर्णत्वास, दीड एकर जागेत गडकोट किल्ल्यांसारखी तटबंदी
Last Updated : Feb 11, 2025, 11:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details