छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Chhatrapati Sambhaji Nagar Accident : वनविभागाची चाचणी परीक्षा देऊन परतणाऱ्या बहिणीचा आपल्या दोन भावांसह अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरात घडली. गुरुवारी सकाळी तिघेजण दुचाकीवरून जात असताना मागून येणाऱ्या डंपरने त्यांना जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला. या घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला असून तिथे असलेल्या हॉटेल चालकाने पोलिसांना या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. तसंच घटनेची माहिती कळताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून घाटी रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळाला.
सकाळी झाला अपघात : प्रवीण भगवान अंभोरे (वय-28), प्रतिक्षा भगवान अंभोरे (वय-22), प्रदीप उर्फ लखन भगवान अंभोरे (वय 20) (रा. आकोली ता. जिंतूर) असे मृतांचे नाव आहे. हे तिघं बहीण भाऊ असून ते सातारा परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. गुरुवारी सकाळी बहीण प्रतिक्षा अंभोरे हीची वनविभागाच्या नोकरीसाठी एमआयडीसीच्या मैदानावर शारिरीक चाचणी होती. शारिरीक चाचणी देऊन तिघेजण झाल्टा फाट्याकडून देवळाई चौकाकडे येत असताना पाटीलवाडा हॉटेल समोर पाठीमागून हायवाने धक्का मारल्यामुळं ते तिघं हायवाखाली (डंपर) आले. त्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला. हायवा चालक अपघातानंतर तेथून पसार झाल्याची माहिती तेथील हॉटेल चालकांनी चिकलठाणा पोलिसांना दिली.