नाशिक Chhagan Bhujbal :मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते छगन भुजबळ सध्या नाराज आहेत. आरक्षणाविरोधात ते जाहीरपणे आपली भूमिका मांडतायेत. यासाठी त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देखील दिला होता. या पार्श्वभूमीवर आता त्यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची माहिती देणारं पत्र मिळालंय. छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयाला हे निनावी पत्र मिळालं. या पत्राद्वारे त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. पत्र लिहिणाऱ्यानं स्वत:ला भुजबळांचा हितचिंतक म्हटलंय.
पत्रात काय म्हटलंय : हातानं लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे की, "साहेब (छगन भुजबळ), तुम्हाला उडवण्याची सुपारी 5 लोकांनी घेतली आहे. ते गंगापूर-दिंडोरी-चांदशी इथं हॉटेलमध्ये थांबले आहेत. तुम्हाला उडवण्याची 50 लाखांची सुपारी घेण्यात आली आहे. साहेब सावध राहा. हे पाच गुंड तुमचा रात्रभर शोध घेत फिरतायेत. सागर हॉटेलसमोर त्यांची मिटिंग झाली." छगन भुजबळांना मिळालेल्या या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. स्थानिक पोलीस या पत्राची चौकशी करत आहेत.