मुंबई -येत्या काही दिवसांसाठी राणीच्या बागेतील प्राण्यांच्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेतली जात असून, एका बाजूला चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवले असतानाच दुसरीकडे एव्हीएन फ्लू या व्हायरसने म्हणजेच बर्ड फ्ल्यूने प्राण्यांमध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण केलंय. या विषाणूमुळे नागपूरच्या गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील तीन वाघांचा मृत्यू झालाय. त्यामुळे केंद्र सरकारने पुढील काही दिवस प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, पालिकेने राणीची बाग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, दक्षता मात्र घेतली जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केलंय.
तीन वाघांचा मृत्यू झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर :आज घडीला राणीच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज हजारो लोक राणीच्या बागेला भेट देतात आणि इथले प्राणी पाहतात. यातून प्रशासनाला देखील रोजचा लाखो रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, बर्ड फ्ल्यू सारख्या आजाराने नागपुरातील तीन वाघांचा मृत्यू झाल्याने प्रशासन अलर्ट मोडवर गेलंय. केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस प्राणी संग्रहालय बंद ठेवण्याचे निर्देश दिले असले तरी राणी बागेत अद्याप कोणताही प्रादुर्भाव झाला नसल्याने राणीची बाग योग्य ती काळजी घेऊन सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. सोबतच केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार बागेतील प्राण्यांची योग्य ती काळजी घेत असल्याचेदेखील संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी म्हटलंय.
राणीच्या बागेत वाघ, कोल्हे, बिबटे, अस्वल असे मांसाहारी प्राणी :आता तुम्ही म्हणाल राणीच्या बागेत वाघ, कोल्हे, बिबटे, अस्वल असे मांसाहारी प्राणीदेखील आहेत. मग ते काय खाणार? या संदर्भात आम्ही वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिषेक साटम यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की, "जंगली मांसाहारी प्राण्यांना आहारात थोडा बदल म्हणून आठवड्यातून एकदा चिकन दिले जाते. मात्र, बर्ड फ्ल्यू आजाराची शक्यता लक्षात घेता या मांसाहारी प्राण्यांना पुढचे काही दिवस चिकन न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. इतर वेळी या प्राण्यांना अन्य प्राण्यांचे मांस दिले जाते. प्राणी संग्रहालयात या मांसाहारी प्राण्यांसाठी येणारे मांसदेखील योग्य ती तपासणी करूनच या प्राण्यांना दिले जाते."
पिंजरा व्यवस्थित स्वच्छ केला जातोय : दरम्यान, बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात असल्याचे संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी म्हटलंय. त्यांनी सांगितले की, संग्रहालयातील प्रत्येक पिंजरा व्यवस्थित स्वच्छ केला जात असून, इतर प्राण्यांची राहण्याची ठिकाणे स्वच्छ ठेवून निर्जंतुक केली जाताहेत. सोबतच मृत पक्षांद्वारे या विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी देखील विशेष काळजी घेतली जात असल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितलंय.
राणीच्या बागेतील प्राण्यांच्या आहारात बदल, बर्ड फ्ल्यू आजारामुळे प्रशासन अलर्ट मोडवर - BMC ZOO ON BIRD FLU
एका बाजूला चीनमधील एचएमपीव्ही व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवले असतानाच दुसरीकडे एव्हीएन फ्लू या व्हायरसने म्हणजेच बर्ड फ्ल्यूने प्राण्यांमध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण केलंय.
राणीच्या बागेत बर्ड फ्ल्यू (Source- ETV Bharat)
Published : 7 hours ago