महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूरमधील सहा मतदारसंघात काय स्थिती आहे? बंडखोरांचा महाविकास आघाडीला फटका बसणार?

चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार अशी सरळ लढत होणार आहे. असे असले तरी महाविकास आघाडीसमोर बंडखोर उमेदवारांचे आव्हानदेखील आहे.

chandrapur Vidhansabha election
चंद्रपूर विधानसभा निवडणूक (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2024, 7:43 AM IST

Updated : Nov 5, 2024, 9:18 AM IST

चंद्रपूर : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तीन राजकीय पक्षांचा समावेश असल्यानं उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होतानाचे चित्र राज्यभरात दिसत आहे. त्याला चंद्रपूर जिल्हाही अपवाद ठरला नाही. जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात ही बंडखोरी दिसून येत आहे. मात्र, ही बंडखोरी शमविण्यात महायुतीला अपयश आले. बंडखोरीमुळे महाविकास आघाडीसमोरदेखील मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 4 नोव्हेंबरला शेवटचा दिवस होता. यात चंद्रपूरमधील सहा मतदारसंघातून 25 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात आता 95 उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. महायुतीत बंडखोरी करणाऱ्या अनेक उमेदवारांनी अखेर आपले नाव मागे घेतलं आहे. मात्र, महाविकास आघाडीला बंडखोरांची मनधरणी करण्यात अपयश आले.

चंद्रपूरमधील सहा मतदारसंघात काय स्थिती आहे (Source- ETV Bharat Reporter)



चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत काय स्थिती आहे?-चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूनं बंडखोरी झाली. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार यांनी ऐनवेळी भाजपामध्ये प्रवेश केला. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय ब्रिजभूषण पाझारे यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे त्यांनी जोरगेवार यांच्या विरोधात थेट बंड पुकारत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. पाझारे गेल्या काही वर्षांपासून आमदारकीच्या तयारीला लागले होते. यासाठी त्यांनी जनसंपर्क कार्यालयदेखील उघडले होते. मात्र, जोरगेवार यांना तिकीट मिळाल्यानं प्रचंड नाराज झालेले पाझारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. शेवटच्या क्षणी ते आपला अर्ज मागे घेतील, अशी शक्यता होती. मात्र, त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. तर काँग्रेसकडून प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले राजु झोडे यांनी बंड केले. या दोघांनीही शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे न घेतला नाही. त्याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसणार आहे.



बल्लारपूरमध्ये तिरंगी लढत-बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपाकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उभे आहेत. तर काँग्रेसनं यावेळी संतोष रावत यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे या शर्यतीत असलेल्या डॉ. अभिलाषा गावतुरे या नाराज झाल्या आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून उभे राहण्याचा निर्णय घेतला. गावतुरे यांची समजूत काढण्यात महाविकास आघाडीला अपयश आले. त्यामुळे शेवटच्या क्षणीदेखील गावतुरे यांनी माघार घेण्यास नकार दिला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनीदेखील अर्ज दाखल केला होता. शिवसेना (उद्धव ठाकरे) ही जागा मिळवण्यासाठी आग्रही होता. मात्र, ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. अखेरच्या दिवशी गिर्हे यांनी आपला अर्ज परत घेतला. त्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात तिरंगी लढत बघायला मिळण्याची शक्यता आहे.



राजुरा विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?-भाजपाकडून यावेळी मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे देवराव भोंगळे यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे येथील स्थानिक नेत्यांनी बंड पुकारले. माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी या निर्णयाला उघड विरोध दर्शवला. याबाबत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर करणा असल्याचं जाहीर केलं. यानंतर या दोघांनीही अपक्ष म्हणून आपला नामांकन अर्ज सादर केला. या दोघांची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले. अखेरच्या दिवशी या दोघांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. येथे काँग्रेसनं विद्यमान आमदार सुभाष धोटे यांना तिकीट दिलं आहे. तर शेतकरी संघटनेकडून वामनराव चटप हे निवडणुकीला सामोरे जात आहेत.



वरोरा विधानसभेत -वरोरा विधानसभा ही नक्की कुणाची यावरून महाविकास आघाडीत चांगलीच रस्सीखेच झाली. ही जागा मिळावी यासाठी शिवसेना ( उद्धव ठाकरे) आग्रही होती. मात्र ही जागा काँग्रेसला गेली. यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदार आणि सध्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज झालेले शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) जिल्हाप्रमुख यांनी बंड पुकारत अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला. अखेरच्या क्षणीदेखील त्यांनी माघार घेतली नाही. भाजपानं ही तिकीट दिवंगत माजी मंत्री संजय देवतळे यांचा मुलगा करण देवतळे यांना दिली. अपक्ष म्हणून डॉ. चेतन खुटेमाटे हेदेखील या शर्यतीत आहेत. काँग्रेसकडून तिकीट मिळण्यास त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा आपला निर्धार कायम ठेवला.


चिमूर विधानसभेत बंड शमले-भाजपानं दोनवेळा निवडून आलेले आमदार बंटी भांगडीया यांना तिसऱ्यादा उमेदवारी जाहीर केली. तर 2019 मध्ये अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले सतीश वारजूरकर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आलं आहे. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय मते घेणारे धनराज मुंगळे यांनी यावेळीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली.



ब्रम्हपुरी विधानसभेत महाविकास आघाडीला आव्हान-विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे विधानसभा क्षेत्र म्हणून ब्रम्हपुरी क्षेत्राची ओळख आहे. त्यांच्या विरोधात भाजपानं कृष्णा सहारे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. यामुळे नाराज झालेले वसंत वारजूरकर यांनी दंड थोपटले होते. मात्र त्यांची मनधरणी करण्यात महायुतीला यश आले. अखेरच्या दिवशी त्यांनी माघार घेतली. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बंडखोरी शमवण्यात महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीला यश आले. तर महाविकास आघाडीसमोर बंडखोरासंह महायुतीच्या उमेदवारांचे आव्हान असणार आहे.

हेही वाचा-

  1. किशोर जोरगेवारांच्या पक्ष प्रवेशानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली नमती बाजू; नेमकं काय म्हणाले?
  2. महाविकास आघाडीतर्फे बंडखोरी रोखण्यात यश; भाजपाच्या हिना गावित यांची बंडखोरी कायम
Last Updated : Nov 5, 2024, 9:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details