चंद्रपूर :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सध्या जोरात सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नियोमी साटम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जीएसटीचे सहायक आयुक्त मोहन खोब्रागडे, आयकर अधिकारी सुरेश चौधरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू :यावेळी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची घोषणा होताच जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवजणूक 2024 ही मुक्त आणि पारदर्शक वातावरणात घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चोख असणं आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आयकर विभाग, केंद्रीय आणि राज्य जीएसटी विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, रेल्वे पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, वन विभाग आणि इतर यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेच्या नोडल अधिकाऱ्यांशी नियमित संपर्क ठेवून समन्वयातून काम करावं.
अवैध रोख, दारू, पैशांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना :अवैध रक्कम, दारूचा पुरवठा, संशयित बाबी, ड्रग्ज आदी बाबींच्या जप्तीबाबत निवडणूक आयोगाच्या कठोर सूचना आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं. महाराष्ट्रात निवडणुकीमुळे इकडून तिकडं पैशाची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी दक्ष असावं. आपापल्या सूत्रांच्या माध्यमातून गोपनीय माहिती मिळविण्यावर भर देऊन योग्य कारवाई करावी. जिल्ह्याच्या सीमेलगतच्या चेक पोस्टवर त्वरीत अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तपासणी दरम्यान एखादं वाहन पकडलं तर त्याचा पूर्वइतिहास तपासावा. जिल्ह्यात येणारं पार्सल तसेच बस आणि ट्रॅव्हल्समधून होणारी पार्सल वाहतुकीची तपासणी करावी.