महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सायरस पूनावाला यांचं योगदान 'पद्मभूषण'पुरतंच मर्यादित नाही, त्यांना 'भारतरत्न' द्यावा; शरद पवार यांची मागणी - सायरस पूनावाला

Sharad Pawar On Cyrus Poonawalla : देशातला सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून 'भारतरत्न' पुरस्काराला विशेष मान आहे. यावर्षी आतापर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तब्बल पाच जणांना 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाले आहेत. यानंतर देशातील इतर दिग्गज व्यक्तींनाही 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी जोर धरू लागलीय. अशीच एक मागणी शरद पवार यांनी केलीय.

Cyrus Poonawalla
सायरस पूनावाला

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 9:21 AM IST

Updated : Feb 15, 2024, 10:50 AM IST

कार्यक्रमात बोलताना शरद पवार

पुणे Sharad Pawar On Cyrus Poonawalla : कोरोना महामारीच्या काळात सीरमनं संपूर्ण जगाला कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा केला होता. सायरस पुनावाला यांनी लस निर्मिती क्षेत्रात केलेल्या कार्याचं कौतुक करत त्यांना 'भारतरत्न' देण्याची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीय.

शरद पवार यांची मागणी : सायरस पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली लस जगातील अनेक देश घेत आहेत. पूनावाला यांच्यामुळंच भारत कोरोनासारख्या संकटातून बाहेर पडू शकलाय. त्यांचं वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता केवळ 'पद्मभूषण' पुरस्कारापुरते त्यांना मर्यादित न ठेवता, केंद्र सरकारनं त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' पुरस्कारानं गौरवावं, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केलीय.

सीरम इन्स्टिट्यूटचं जागतिक स्तरावर आहे योगदान : वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सायरस पूनावाला यांना 'वनराई फाउंडेशन' तर्फे शरद पवार यांच्या हस्ते 'दिवंगत डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार' प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, "डॉ. मोहन धारिया यांनी आपल्या राजकारण आणि समाजकारणानं देशाला वेगळी दिशा दाखवून दिली. 'राष्ट्र प्रथम' ही मोहन धारिया यांची विचारसरणी होती. सीरम इन्स्टिट्यूट हे एक प्रकारे त्यांच्याच विचारांवर वाटचाल करून केवळ देशाचाच नव्हे तर जगातील प्रत्येकाचा विचार करून लस निर्मिती करत आहे. आज जगातील अनेक देश सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली लस घेत आहेत." पवार पुढे म्हणाले, "सीरम इन्स्टिट्यूटचं जागतिक स्तरावरील योगदान आपल्याला लक्षात येऊ शकतं. 'सीरम'चं योगदान लक्षात घेता सायरस पूनावाला यांचं कर्तृत्व केवळ 'पद्मभूषण' पुरस्कारानं सन्मानित न करता त्यांना देशातील सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं."

सीरम इन्स्टिट्यूटला केलं वेळोवेळी मार्गदर्शन : सायरस पूनावाला म्हणाले, "डॉ. मोहन धारिया हे जेव्हा देशाच्या नियोजन समितीचे उपाध्यक्ष होते, त्यावेळी सीरम इन्स्टिट्यूटच्या वाटचालीमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं. त्यानंतरही त्यांनी सीरम इन्स्टिट्यूटला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वाधिक लस निर्माण करणारी संस्था व्हावी असं माझं स्वप्न नव्हतं. आज कोट्यवधी लहान मुलांचा जीव आमच्या संस्थेनं तयार केलेल्या लसीमुळं वाचत आहे ही एक प्रकारे समाधानाची बाब आहे."

हेही वाचा -

  1. लेकीसाठी बाप मैदानात, शरद पवार उद्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघात घेणार विधानसभा निहाय बैठका
  2. शरद पवार गट काँग्रेसमध्ये होणार विलीन? आमदार रोहित पवार म्हणाले 'पतंग' उडवणाऱ्यांपासून सावध राहा
  3. शरद पवार यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पवारांची आमदार-खासदारांसोबत पुण्यात महत्त्वाची बैठक
Last Updated : Feb 15, 2024, 10:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details