मुंबई Marathi Language Classical Language : केंद्र सरकारनं मराठी भाषेला 'अभिजात' भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय. मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयानं मराठी भाषा सातासमुद्रापार आणखी जास्त वेगानं पोहोचणार आहे. 'माझा मराठीची बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके॥' ही संत ज्ञानेश्वर महाराजांची ओवी शेयर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचं अभिनंदन करत केंद्राचे आभार मानले. 'मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलं.
संत ज्ञानेश्वर महाराजांची ओवी :आज तमाम मराठी माणसाला संत ज्ञानेश्वर यांची 'माझा मर्हाटाची बोलु कवतिके। परि अमृतातेही पैजांसि जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन।।’ ही मराठीच्या संदर्भातील ओवी नक्की आठवेल. पाठ्यपुस्तकांपासून ते भाषणं, व्याख्यानं, लेखांपर्यंत या ओवीचा उल्लेख वाचायला, ऐकायला मिळतो. पण संत ज्ञानेश्वरांची `मर्हाटी भाषासुंदरी’ ही कविताही अनुभवणं एक सुंदर अनुभव आहे. आपल्याला आपल्याच मराठीचा नव्यानं परिचय करून देणारी आहे. आत्मविश्वास आणि अभिमानाची भावना देणारी आहे.
लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान -मुख्यमंत्री : "अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आलं. यासाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडं सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झालं, त्यांचंही मन:पूर्वक आभार!" अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार : "मराठी भाषेला 'अभिजात दर्जा' देण्याचा निर्णय गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचं महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीनं अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सातत्यानं पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथांचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले," अशी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले.