कर्जत Kopardi Crime News : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणामुळं 2016 मध्ये चर्चेत आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी या गावात पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. गावातील यात्रेत तमाशात नाचण्याच्या वादातून एका मागासवर्गीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. हा अपमान सहन न झाल्यानं तरुणानं आत्महत्या केली. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
तिघांविरुद्ध गुन्हा दाखल : या प्रकरणी गावातील तिघांविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील ३ आरोपींपैकी एकाला अटक केली आहे. तसंच इतर दोघांचा शोध सुरू असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं. मुख्य म्हणजे या घटनेलाही जुन्या घटनेचा संदर्भ आहे. आत्महत्या केलेला तरुण जुन्या घटनेतील मुख्य आरोपीचा चुलत भाऊ तर आरोपींपैकी एक जण मृत अल्पवयीन (निर्भया) मुलीचा चुलत भाऊ आहे. त्यामुळं या ताज्या घटनेमुळं गावातील वातावरण पुन्हा ढवळून निघालं असून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय.
नेमकं काय घडलं : 1 मे ला गावात भैरवनाथाची यात्रा होती. त्यासाठी तमाशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी नाचण्यावरून पीडित तरुणाचा गावातील अन्य तरुणांशी वाद झाला. तेव्हा त्यांनी त्याला मारहाण केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित तरुणाचे वडील आपल्या मुलाच्या घरी आले असता, तो रात्रीपासून घरी नसल्याचं त्यांना कळलं. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता पीडित तरुण गावाच्या स्मशानभूमीत विवस्त्र अवस्थेत आढळून आला.
त्याला घरी घेऊन आल्यानंतर त्यानं रात्रीचा प्रकार सांगितला. गावातील दिनेश ऊर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रिक, वैभव मधुकर सुद्रिक या तिघांनी आपल्याला तमाशात नाचण्यावरून जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर घरी येत असताना विवस्त्र करून मारहाण केली आणि स्मशानभूमीत सोडून दिलं. कपडे नसल्यानं तसंच अपमान सहन होत नसल्यानं आपण घरी आलो नाही, असं पीडित तरुणानं आपल्या वडिलांना सांगितलं. त्यानंतर काही वेळानं तो आपल्या चुलत्याच्या घरी गेला आणि तिथं त्यानं आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यानं आपल्यासोबत घडलेली घटना आणि आरोपींची नावं असलेली चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्याआधारे त्याच्या वडिलांनी तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कोपर्डी घटनेतील पीडित मुलीच्या भावाचा समावेश :कोपर्डी गावात 13 जुलै 2016 ला अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. हे प्रकरण राज्यभर गाजलं. त्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली. यातील मुख्य आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू बाबूलाल शिंदे यानं तुरुंगातच आत्महत्या केली. जितेंद्र आणि पीडित तरुण चुलत भाऊ आहेत. पीडित तरुणानं जितेंद्रच्या घरातच आत्महत्या केली. तर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण 2016 च्या घटनेतील पीडित मुलीचा चुलत भाऊ आहे. असा जुना संदर्भ या नव्या घटनेला लागत असल्यानं पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवलाय.
हेही वाचा -
- चोरट्यांचा पाठलाग करणं ठरलं जीवघेणा; मोबाईल घेण्यासाठी गुन्हेगाराच्या मागे धावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू - Mumbai Crime News
- मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या; चिकन तंदुरीच्या पैशावरून झाला वाद - Mumbai Crime News
- नात्यातील ओलावा आटला : मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या, तर बहिणीनं सुपारी देऊन भावाचा काढला 'काटा' - Nagpur Crime