पालघर : अलीकडच्या काळात शेती करणं कठीण झालं आहे. त्यात वसई सारख्या परिसरात तर शेतीऐवजी उद्योग आणि नोकऱ्या करण्याकडे लोकांचा कल आहे. अशा परिस्थितीत वसई तालुक्यातील गिरीज गावातील मारोडेवाडी येथे निकलस कर्व्हालो, त्याचे चिरंजीव अनिल आणि सून हर्षाली यांनी वाडवडीलांची गुलाबी लसणाच्या शेतीची परंपरा पुढे चालू ठेवली आहे. अवघ्या दोन गुंठ्यांत हे गुलाबी लसणाचे वाण जिवंत ठेवण्यासाठी हे कुटुंब अतोनात कष्ट घेत असून पालघर जिल्ह्यात यांच्या व्यतिरिक्त हे उत्पन्न कुठेही घेतलं जात नाही. त्यामुळं त्यांच्या लसणाचा सुगंध दूरवर दरवळत असून लसूण लागवडी अगोदरच खरेदीचे बुकिंग झालेले असते.
वसई जवळ कर्व्हालो कुटुंबीयांची शेती आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. केळी, कांदा बोकर्ली, वांगी, फ्लावर्स, बनकेळी अशी पिके घेतली जातात. हे कुटुंब बाहेरून फारसं काही खरेदी करत नाही. तेल वगळता अन्य गरजा या त्यांच्या शेतीतून पूर्ण होतात. लाॅकडाउनच्या काळात तर त्यांचं कुटुंब शेतीतील उत्पादनावरच जगत होते. लाॅकडाउनच्या काळात सर्व बंद असल्यानं त्यांना शेतीतील पिकांतून जादा उत्पन्न मिळाले.
गुलाबी लसणाच्या शेतीत पडला नाही खंड : कर्व्हालो कुटुंब अन्य पिकांच्या साखळीत जरी बदल करीत असले, तरी गुलाबी लसणाची शेती मात्र ते कायम करतात. गुलाबी लसणाची शेती मोठ्या क्षेत्रावर केली जात नाही. वसई पश्चिममधील गिरीज तलावानजीक मारोडे भागात त्यांची ही लसणाची शेती आहे. या परिसरातील जमीन अतिशय कडक असते. परंतु अनिल स्वतःच्या पावर ट्रिलरनं तीन-चारवेळा मशागत करून ती भुसभुशीत करतात, त्यात शेणखत घातलं जातं. कर्व्हालो कुटुंबीयांनी रासायनिक खतांना दूर ठेवलं असून सेंद्रिय खते आणि शेणखतावरच भर दिला आहे.
लसणाची शेती करणं अवघड : लसणाची शेती तितकीशी सोपी नाही. एकेक पाकळी स्वतंत्र करून खणप्यानं अर्धा इंच खोल पाकळी लावावी लागते. दोन पाकळ्यांच्या मध्ये वितभर अंतर ठेवावं लागतं. लसूण रुजायला पंधरा दिवस लागतात. लसूण लावल्यानंतर त्याला योग्य प्रमाणातच पाणी देणं गरजेचं आहे. पाणी जास्त दिलं, तर लसूण सडण्याचा धोका असतो. त्यामुळं पाणी ठराविक अंतरानं द्यावं लागतं. पंधरा दिवसानंतर लसूण पातळ झाला असेल, तर पुन्हा मोकळ्या जागी दुसऱ्यांदा लसणाची लागवड करावी लागते. जमिनीचा पोत बिघडू नये, म्हणून निर्माल्यापासून तयार केलेलं खतच या गुलाबी लसणाच्या शेतीसाठी वापरलं जातं. एरवी दर दहा दिवसांनी पाणी दिलं जातं, तर ऊन वाढल्यानंतर मात्र, आठ दिवसांनी पाणी द्यावं लागतं. नव्वद दिवसात लसून तयार होतो. त्या अगोदर त्यावर करपा पडायला लागला, तर फवारणी करावी लागते. शिवाय दव पडण्याच्या काळात अधिक लक्ष द्यावं लागतं. एकदा लसूण तयार झाला, की ते आपोआप कळते.