महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडवलं, दोघांचा जागीच मृत्यू - car accident killed 2

Car accident killed 2 : सातारा जिल्ह्यातील माण-खटावचे भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडवल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झालाय. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून स्कार्पिओ कारचा पुढील भाग उद्ध्वस्त झाला आहे.

जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडवलं
जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडवलं (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 4:37 PM IST

सातारा Car accident killed 2 - माण-खटावचे भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील स्कार्पिओ कारने स्कूटीला उडवल्यानं दोन जण जागीच ठार झाले आहेत. रणजित राजेंद्र मगर (वय ३२) आणि अनिकेत नितीन मगर (वय २६), अशी मृतांची नावं आहेत. शनिवारी सकाळी शेरेवाडी फाटा (ता. माण) येथे हा अपघात झाला. मृतांपैकी रणजित हा विवाहित होता. या अपघातात स्कूटीचा आणि स्कार्पिओच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील कारने दुचाकीला उडवलं ते घटनास्थळ (ETV Bharat Reporter)

जनसंवाद दौऱ्यावर जात असताना अपघात- घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत आणि रणजित हे शेरेवाडी फाट्यावरून बिदालच्या दिशेने स्कूटीवरून (क्र. एम. एच. ११ डी. के. ८४५५) निघाले होते. यावेळी भाजपा आमदार जयकुमार गोरे यांचा ताफा जनसंवाद दौऱ्यावर दहिवडीच्या दिशेनं निघाला होता. शेरेवाडी फाटा येथे आ. गोरेंच्या ताफ्यातील स्कार्पिओ चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता न आल्याने समोरून येणाऱ्या स्कूटीला स्कार्पिओ कारने उडवलं.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू - या भीषण अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या अनिकेत आणि रणजित या दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची बातमी दहिवडी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

आ. गोरे ग्रामीण रुग्णालयात उपस्थित - अपघातानंतर दोन्ही जखमींना दहिवडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. यावेळी आमदार जयकुमार गोरे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. आमदारांच्या ताफ्यातील कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळ आणि रुग्णालयाकडे धाव घेतली. या घटनेमुळं बिदाल शेरेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details