मुंबईCannabis Seized : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉक ते मुंबई या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाईटमधून आलेल्या महिलेकडे ४२७३ ग्राम गांजा आढळून आल्याने या महिलेला महसूल गुप्तचर संचालनालयाने (एआययू) अटक केली आहे. अटक महिलेचे नाव फिझा जावेद खान (वय ३७) असं असून तिला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जप्त गांजाची किंमत १ कोटी ९५ लाख रुपये इतकी आहे.
हिरवा पदार्थ ड्रग्ज असल्याचं उघडकीस :याप्रकरणी एनडीपीएस कायदा कलम २१(ब), २३(ब), २८, २९, ३०, ३५ आणि ५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फिझा जावेद खान ही बँकॉकहून मुंबईला आली होती. तिच्याकडे निळ्या आणि ग्रे रंगाची ट्रॉली बॅग होती. तिच्याकडे असलेल्या निळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेत कपडे, काही वैयक्तिक सामान आणि ९ प्लास्टिक ट्रान्सपरंट पिशव्या आढळून आल्या. या ट्रान्सपरंट प्लास्टिक पिशव्यांमध्ये हिरव्या रंगाचा काही पदार्थ सापडल्याने तेथे हजर असलेल्या एआययूच्या अधिकाऱ्यांनी नार्कोटिक ड्रग फिल्ड टेस्टिंग किटने सापडलेल्या हिरव्या पदार्थाची चाचणी केली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्लास्टिकच्या ट्रान्सपरंट पिशवीतील हिरवा पदार्थ ड्रग्ज असल्याचं उघडकीस आलं.