मुंबई Party Candidates Exchange : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याची अनेक नेत्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी पक्षातून उमेदवारी आणि तिकीट मिळवण्यासाठीसुद्धा प्रयत्न केले; मात्र आपल्याला तिकीट मिळत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर अनेक नेत्यांनी या पक्षातून त्या पक्षात उडी मारल्याचे चित्र आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून या पक्षातून त्या पक्षात उडी मारण्याचे प्रमाण वाढले आहे.
'या' नेत्यांनी केलंय पक्षांतर :कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, हे कुठल्याच पक्षात नव्हते; मात्र लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना काँग्रेसमध्ये यावे लागले आहे. सांगलीतील चंद्रहार पाटील, फेब्रुवारी 2024 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते; मात्र मार्च 2024 मध्ये ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. पुणे-वसंत मोरे, मार्च 2024 पर्यंत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात होते. मार्च 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर मोरेंना लोकसभा निवडणूक उमेदवारीचे तिकीट देण्यात आहे.
निलेश लंके शरद पवारांच्या गटात :शिरूर-शिवाजी आढळराव-पाटील, मार्च 2024 पर्यंत (शिंदे गट) शिवसेनेत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अहमदनगरचे निलेश लंके हे मार्च 2024 पर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. यानंतर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. आता ते शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत. अमरावती-नवनीत राणा या मार्च 2024 पर्यंत अपक्ष म्हणून खासदार होत्या. लोकसभेसाठी एप्रिल महिन्यात त्यांनी भाजपात प्रवेश केला. आता त्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत.
अमर काळे कॉंग्रेसमधून शरद पवारांच्या गटात :वर्धा येथील अमर काळे, मार्च 2024 पर्यंत काँग्रेस पक्षात होते. मात्र, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आणि उमेदवारी तिकीट मिळवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. अमर काळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रामटेक येथील राजू पारवे, मार्च 2024 पर्यंत काँग्रेस पक्षात होते. मात्र, लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. आता शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पालघर येथील राजेंद्र गावित, मार्च 2024 पर्यंत शिवसेनेत होते; मात्र लोकसभा निवडणुकीसाठी भाजपामध्ये त्यांनी प्रवेश घेतलाय. मात्र अद्यापपर्यंत त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही. भिवंडी- सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, शिवसेना, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत आणि आता लोकसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मावळचे- संजोग वाघेरे अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते; मात्र आता लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.
भाऊसाहेब वाकचौरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत :शिर्डीतील भाऊसाहेब वाकचौरे हे पूर्वी भाजपा आणि काँग्रेसमध्ये होते. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आले आहेत. यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. बीडचे बजरंग सोनवणे, मार्च 2024 पर्यंत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र, आता लोकसभा तिकीट मिळवण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. धाराशिव येथील अर्चना पाटील सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. त्यांनी नंतर मार्च 2024मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यांनी आता लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सध्या पाटील ह्या धाराशिवमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रावेर मधील श्रीराम पाटील, मार्च 2024 पूर्वी भाजपामध्ये होते. मात्र लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. माढा येथील रमेश बारस्कर, मार्च 2024 पूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र तिथे तिकीट मिळत नसल्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. जळगाव-करण पवार, मार्च 2024 पर्यंत भाजपामध्ये होते. भाजपा पक्षात अनेक पदावर काम केले; मात्र तिथे तिकीट न मिळाल्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी (शिवसेना) ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्यसभेसाठी 2 मोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश :काही दिवसांपूर्वी राज्यात राज्यसभा निवडणूक पार पडली. मिलिंद देवरा यांना काँग्रेस पक्षाकडून आपणाला खासदारकी मिळेल अशी त्यांना आशा होती. याबाबत त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. मात्र काँग्रेस पक्षाने दखल न घेतल्यामुळं त्यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदारकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाणांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. देवरा आणि चव्हाण या दोन मोठ्या आणि दिग्गज नेत्यांनी काहीच दिवसांपूर्वी पक्षांतर केले आहे.
'हे' नेते अन्य पक्षाच्या वाटेवर?:शिवसेना (शिंदे गट) नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट मिळणार की नाही हे अद्यापपर्यंत स्पष्ट नाही. मात्र, इथे हेमंत गोडसे ऐवजी छगन भुजबळ यांना तिकीट मिळावे अशी आग्रही भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. हेमंत गोडसे यांना येथे तिकीट मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे जर तिकीट मिळाले नाही तर हेमंत गोडसे हे वेगळा मार्ग पत्करणाच्या तयारीत असून ते ठाकरे गट (शिवसेना) किंवा अन्य पक्षात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे हे स्वगृही म्हणजे भाजपात परतण्याच्या तयारीत आहेत. काही दिवसात ते भाजपात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याव्यतिरिक्त अनेक नेते हे पक्षांतराच्या तयारीत आहेत. तिकीट मिळाले नाही किंवा मिळणार नाही हे समजल्यावर अनेकांनी पक्षांतर केलेलं आहे. तर अनेकांची इच्छा असून देखील पक्षानं दखल घेतली नसल्यामुळे आगामी काळात बंड देखील होण्याची शक्यता आहे. परंतु, सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इन्कमिंग-आऊटगोइंग जोरात सुरू आहे. आयाराम-गयारामांना ऊत आला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
हेही वाचा :
- सरकारी यंत्रणा म्हणजे भाजपाचे कार्यालय झाले; नकली शिवसेनेवरुन अंबादास दानवेंची पंतप्रधान मोदींवर टीका - Ambadas Danve On Pm Modi
- गर्दी न जमल्यानं झाला वाद; माजी आमदार आणि जिल्हाप्रमुखांमध्ये हाणामारी - Amravati Lok Sabha Constituency
- नाक रगडण्यासाठी मातोश्रीवर आला होतात, कोण नकली, कोण असली हे ठरवणारे तुम्ही कोण- राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल - Sanjay Raut News