मुंबई Maharashtra Cabinet Expansion :लोकसभा निवडणुकांच्या पराभवानंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे. राज्यातील नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. त्यामुळं काही जुन्या मंत्र्यांनाही डच्चू देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवशेनाला 27 जूनपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून सरकारच्या कामाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कोणाला मिळणार संधी :राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या मुख्यमंत्र्यांसह 43 इतकी असू शकते. सध्या 29 मंत्री आहेत. त्यामुळं मंत्रिमंडळात 14 जणांना संधी दिली जाऊ शकते. शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांचा नुकताच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय झाला आहे. त्यामुळं ते मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा देतील. त्यामुळं मंत्रिमंडळात आणखी एकाला संधी मिळणार आहे. संदीपान भुमरे यांच्या जागी संजय शिरसाट यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, पक्ष नेतृत्वाचे आदेश असल्यास आपण जबाबदारी घ्यायला तयार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
शेलारांची वर्णी लागण्याची शक्यता :लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदावरून दूर होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांचा निर्णय लांबणीवर पडला. त्यामुळं अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस पदावर कायम राहणार की त्यांच्या जागी दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार हे लवकरच स्पष्ट होईल. सोबतच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अन्य काही नेत्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात नवीन चेहरे :देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा, मित्रपक्षांचे नेतेही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच विधानसभेची निवडणूक लढवू, असं सांगताय. भाजपाचे दिल्लीतील नेतृत्व तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून अधिकृतपणे तशी घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तारात काही नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे.
'हे' वचालंत का :
- भाजपाच्या अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे; अध्यक्षपदाच्या स्पर्धेत विनोद तावडे, संकेत की चकवा? - BJP National President
- लोकसभा निवडणुकीत हरलेल्यांना वाटतंय ते जिंकले, तर जिंकलेल्यांना वाटतंय ते हरले...वाचा असं का.. - Lok Sabha Election Result
- 'या' राज्यानं भाजपाला तारल्यानं जिंकल्या 240 जागा, अन्यथा उडाली असती दाणादाण - Lok Sabha Election 2024