मुंबई : नोव्हेंबर 2023 मध्ये वांद्रे-वरळी सी लिंक येथे एक दुर्दैवी अपघात घडला होता. या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघातासाठी कारणीभूत असलेल्या चालकाला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. चालकाचं अचानक लक्ष विचलित झाल्यानं हा अपघात झाल्याचं सकृतदर्शनी दिसून येत असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलंय.
वाहन परवाना निलंबित : उच्च न्यायालयानं चालकाला जामीन मंजूर केला असला तरी पुढील पाच वर्षांसाठी त्याचा वाहन परवाना निलंबित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या खटल्यातील कागदपत्रांचा अभ्यास केल्यावर अपघात चालकाचे अचानकपणे लक्ष विचलित झाल्यानं झाल्याचं समोर येत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. या अपघातामध्ये इतर कोणतेही कारण प्रथम दर्शनी दिसून येत नसल्याचंही न्यायालयानं नमूद केलंय.
सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं? :9 नोव्हेंबर 2023 रोजी 42 वर्षीय मोहम्मद सरफराज शेख या चालकाच्या ताब्यातील इनोवा कारनं वांद्रे-वरळी सी लिंक वरील तीन वाहनांना धडक दिली होती. त्यामध्ये मर्सिडीज कारचाही समावेश होता. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. परंतु, या अपघातात कोणताही अन्य हेतू दिसत नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी चालक शेख याला वीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्याचा वाहन परवाना जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
- अपघातातील चालक शेख हा व्यावसायिक चालक आहे. तो गेल्या पंधरा वर्षांपासून वाहन चालवण्याचं काम करतोय. या कालावधीत त्याच्या नावावर एकाही अपघाताची नोंद झालेली नाही. सी लिंक वरील अपघात हा त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं आणि लक्ष विचलित झाल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं होतं.
न्यायालयानं काय म्हटलंय? :सरकारी वकिलांनी शेखला जामीन देण्यास विरोध केला. शेखच्या निष्काळजीपणामुळं चार जणांना जीव गमवावा लागला असून त्याला जामीन दिल्यास असे कृत्य पुन्हा घडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, शेख हा वाहन चालवताना मद्याच्या अंमलाखाली नव्हता. त्याचा हा अपघात घडवण्यामध्ये कोणताही हेतू नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. हा अपघात नक्कीच दुर्दैवी आहे. तसंच यामध्ये चार जणांचा मृत्यू आणि सहा जण जखमी झाले, ही वस्तुस्थिती आहे. अपघातामध्ये सदर चालकदेखील गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सात दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती, याकडंही न्यायालयानं लक्ष वेधलं.
हेही वाचा -
- Accident on Bandra Worli Sea Link : वांद्रे वरळी सी लिंकवर सहा वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा मृत्यू, पाहा थरारक व्हिडिओ
- Bandra Worli Sea Link Road Accident : मोबाईल फोन चार्जर लावताना अपघात झाल्याचा आरोपीचा दावा, न्यायालयाने दिली एक दिवसाची पोलीस कोठडी
- Bandra Worli Sea Link Road Accident : वांद्रे वरळी सी लिंक अपघात प्रकरणी आरोपी इरफानला अटक