महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांना उच्च न्यायालयाचा दिलासा - BOMBAY HIGH COURT ON SANJAY RATHOD

मुंबई उच्च न्यायालयानं संजय राठोड यांना मोठा दिलासा दिला आहे. मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात चित्रा वाघ यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली.

Bombay High Court On Sanjay Rathod
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2025, 1:49 PM IST

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. संजय राठोड यांना या निर्णयामुळे चांगलाच दिलासा मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयानं हा निर्णय घेतला. "याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला अहवाल आणि महानगर दंडाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल पाहता, या प्रकरणात आणखी चौकशी करण्याची गरज नाही," असं मत व्यक्त करून खंडपीठानं हे प्रकरण निकाली काढलं.

चित्रा वाघ यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव :पुणे इथली एक तरुणी तिच्या घराच्या बाल्कनीतून खाली पडून त्यात तिचा मृत्यू झाल्याची घटना 8 फेब्रुवारी 2021 रोजी घडली. या प्रकरणात तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यामुळे संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणात भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली. चित्रा वाघ यांनी या तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करून त्याद्वारे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. हे प्रकरण सीबीआयकडं तपासासाठी सोपवण्याची मागणी देखील केली.

न्यायालयानं ओढले चित्रा वाघ यांच्यावर ताशेरे :संजय राठोड महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात होते. नंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे हे भाजपासोबत जाऊन मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात संजय राठोड हे पुन्हा मंत्री झाले. 2024 च्या ऑगस्ट महिन्यात चित्रा वाघ यांनी उच्च न्यायालयाकडं हे प्रकरण रद्द करण्यात यावं, अशी मागणी केली. मात्र, न्यायालयानं चित्रा वाघ यांना सुनावलं होतं. बदलत्या राजकीय परिस्थितीत चित्रा वाघ यांची याचिकेतील मागणी बदलत असल्याचे ताशेरे न्यायालयानं ओढले होते.

तरुणीच्या वडिलांची हस्तक्षेप याचिका :या प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली. या प्रकरणाच्या तपासावर समाधान व्यक्त करत कोणत्याही राजकारण्या विरोधात आकस नसल्याचं स्पष्ट केलं. या प्रकरणात जनहित याचिका दाखल झालेली असल्यानं कुटुंबीयांना विनाकारण अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी म्हणणं मांडलं. या जनहित याचिकेच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं. या प्रकरणातील तरुणी इमारतीच्या बाल्कनीमधून खाली पडली, त्या प्रकरणी केलेल्या तपासामध्ये सदर तरुणीनं त्या दुर्घटनेवेळी मद्यप्राशन केलं होतं. त्यामुळे ही घटना अपघातानं घडली, असा दावा पोलिसांनी केला. पुणे पोलिसांनी केलेल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी वैद्यकीय अहवाल देखील सोबत जोडला. राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी "या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केली असून जनहित याचिका फेटाळण्यात यावी," अशी विनंती केली.

हेही वाचा :

  1. जनहित याचिकेद्वारे खेळ होतोय; तुमच्या सोयीनुसार भूमिका बदलतात, मुंबई उच्च न्यायालयाने चित्रा वाघ यांना फटकारलं - Mumbai High Court On Chitra Wagh
  2. chitra wagh Vs Sanjay Rathod : संजय राठोड यांच्याविरोधात लढा सुरुच ठेवणार -चित्रा वाघ
  3. Maharashtra Minister Extramartial Affairs - विवाहबाह्य संबंधाच्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील 'हे' नेते आले अडचणीत?

ABOUT THE AUTHOR

...view details