मुंबई Mumbai Roads Potholes : मान्सून वेळेपूर्वीच महाराष्ट्रात दाखल झाल्यानं मुंबईत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून उपाययोजना सुरू झाल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून रस्त्यावरील खड्ड्यांचा 24 तासात निपटारा करण्याचं नियोजन करण्यात आले.
पावसामुळं रस्त्यांवर तयार होणाऱ्या खड्ड्यांच्या तक्रारींचा निपटारा शक्यतो 24 तासांमध्ये करणं ही यंत्रणा म्हणून जबाबदारी घ्यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत दिले. तसंच पावसाळ्यात मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते विभाग आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा सक्षमपणे आणि एकसंघपणे कार्यरत आहे, याचा अनुभव आपल्या कामकाजातून नागरिकांना आला पाहिजे. त्यासाठी सर्व संयंत्रे आणि साहित्याची उपलब्धता राहील याची खातरजमा करा, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिले. या संदर्भातील बैठक बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात गुरुवारी पार पडली. या बैठकीत मुंबईतील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती पालिकेनं दिली.
चौकोनी आकारात मास्टिकद्वारे खड्डे व्यवस्थित भरावेत-पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण 72 मास्टिक कुकर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व मास्टिक कुकर संयंत्रांवर जीपीएस लावून त्याआधारे संयंत्रांच्या उपलब्धततेवर लक्ष ठेवलं जाईल. त्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती करण्यात येत आहे. तसंच संपूर्ण मुंबईत जास्त पावसाच्या कालावधीत रस्त्यांवरील खड्डे बुजविताना प्राप्त तक्रारी लक्षात घेऊन कमीत कमी वेळेत खड्डे बुजविता येतील अशारितीनं मार्गांचा क्रम आखण्यात येणार आहे. खड्डे बुजविताना चौकोनी आकारात मास्टिकद्वारे खड्डे व्यवस्थित भरावेत. खड्डा भरताना वेड्यावाकड्या आकारात भरला जाणारा नाही, यादृष्टीनं खबरदारी घेण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश सहआयुक्त अभिजीत बांगर यांनी दिलेत.