मुंबई Lok Sabha Election 2024 : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. आम्ही रवींद्र वायकर यांच्या विरोधात प्रचार करू, असा थेट इशारा भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. तसेच भाजपाच्या स्थानिक नेत्यानं अपक्ष अर्ज भरण्याचा इशाराही दिला आहे.
महायुतीत उमेदवारीवरुन मोठा पेच :उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात आता अधिक पेच निर्माण होऊ लागले आहेत. या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम आक्रमक होत त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय जवळपास घेतला आहे. संजय निरुपम स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांची भाजपाशी चर्चाही सुरू आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून माजी मंत्री रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. शिंदे यांनी वायकर यांना तयारी करण्यास सांगितलं आहे. मात्र जर शिंदे यांनी वायकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली, तर त्याला भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा जोरदार विरोध असणार आहे. "या निवडणुकीत आम्ही वायकर यांना मदत करणार नाही. उलट त्यांच्या विरोधात प्रचार करू," अशी भूमिका जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे भाजपा उपाध्यक्ष दत्ता शिरसाट यांनी घेतल्याचं सांगितलं.
दत्ता शिरसाट यांचं थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान :जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे भाजपा उपाध्यक्ष दत्ता शिरसाट यांनी वायकर यांच्या नावाची चर्चा सुरू होताच, "आपणही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार," असं स्पष्ट केलं आहे. या मतदारसंघात 80 टक्के मतदान हे कोकणातील आणि विशेषता तळ कोकणातील आहे. शिरसाट यांचा या मतदारसंघात आक्रमक नेता म्हणून परिचय आहे. "जर शिरसाट यांनी वायकर यांना अपक्ष उमेदवारी भरुन आव्हान दिलं, तर वायकर यांच्यासाठी ही निवडणूक निश्चितच अडचणीची ठरणार आहे," असं भाजपाच्या माजी नगरसेविका उज्वला मोडक यांनी सांगितलं.