मुंबई BJP Pressure On Shiv Sena: राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्व राजकीय पक्षांनी आपला मोर्चा विधानसभा निवडणुकीकडं वळवला आहे. राजकीय पक्षांकडून बैठकांचं सत्र सुरू आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. या चार जागांवरुन महायुतीत रस्सीखेच होत असल्याचं दिसून येत आहे. यावरुन महायुतीत मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडं लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं जाहीर केलेले उमेदवार मागे घेण्यास भाजपानं दबाव टाकला होता. त्यानंतर आता विधान परिषदेतही शिवसेनेला दाखल केलेला अर्ज मागं घ्यावा लागला आहे. त्यामुळं महायुतीत भाजपाकडून शिवसेनेवर दबाव टाकला जातोय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
राजू वाघमारे, यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter) भाजपाकडून शिवसेनेवर दबाव :दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करून 40 आमदारांसह भाजपासोबत सरकार स्थापन केलं. एक वर्षानंतर अजित पवारही राष्ट्रवादीतून बंड करून सरकारमध्ये सहभागी झाले. या दोन वर्षात आमचं तीन इंजिनचं सरकार सुरळीत सुरू आहे, असं तिन्ही पक्षाचे नेते सांगताहेत. मात्र लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरुन महायुतीचं एकमत होत नव्हतं. शिवसेनेच्या काही जागांवर भाजपाकडून दावा सांगण्यात येत होता. दुसरीकडं शिवसेनेनं जाहीर केलेले उमेदवार बदलण्यासाठी भाजपाकडून दबाव टाकण्यात आला होता. स्थानिक पातळीवर या उमेदवारांची कामगिरी चांगली नाही. त्यांना तिथून विरोध होतोय. यासाठी भाजपानं हे उमेदवार बदलण्यास शिवसेनेला भाग पाडलं होतं. त्यामुळं भाजपाकडून शिवसेनेवर दबाव असल्याचं दिसून आल्यानंतर महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. आता ही घटना ताजी असताना विधानपरिषद निवडणुकीतही भाजपाकडून शिवसेनेवर दबाव टाकल्याचं चित्र आहे. कारण कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे संजय मोरे यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु शेवटच्या क्षणी संजय मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आलं. त्यामुळं शिवसेना बॅकफूटवर गेली असून, प्रत्येक वेळेस शिवसेनेलाच का तडजोड करावी लागते, असं शिवसेनेतील कार्यकर्त्यात दबक्या आवाजात चर्चा आहे.
महायुतीतीतल मतभेद चव्हाट्यावर : दुसरीकडं मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. गुरुवारी शिवसेनेनंही या ठिकाणी शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी जाहीर केली. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना यांच्यासोबत केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच कार्यकर्ते दिसले. यावेळी महायुतीतील शिवसेना, भाजपामधील कुठलेही नेते दिसले नाहीत. अजित पवारांना सोबत घेतल्यामुळं भाजपाचं महत्त्व कमी झालं. त्यामुळं भाजपाचा महाराष्ट्रात पराभव झाला, असं संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरनं भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडं केंद्रात राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद न मिळाल्यामुळं राष्ट्रवादी नाराज आहे. आता विधान परिषदेसाठी एकाच जागेवर महायुतीतीच्या नेत्यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळं महायुतीतील वाद वारंवार चव्हाट्यावर येत आहेत. महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचं दिसून येत असून, महायुतीत मतभेद असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
महाविकास आघाडीत मतभेद : लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून जागा बदलण्यात आल्या. सर्वेमुळं आम्हाला त्या जागा बदलाव्या लागल्या. आता विधान परिषदेत भाजपाची जागा होती. तिथं आम्ही तडजोड म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यामुळं अर्ज मागे घ्यावा लागला. याचा अर्थ भाजपाचा आमच्यावर दबाव आहे, असं मुळीच म्हणता येणार नाही, असं शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी म्हटलं आहे. तसंच महायुतीत तिन्ही पक्षाचे नेते एकदिलानं काम करत आहेत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. मतभेद असतील, तर महाविकास आघाडीमध्ये दिसतील. महायुतीत आमच्यावर कुठलाच दबाव नसल्याचं शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांनी म्हटलं आहे.
'हे' वाचलंत का :
- अजित पवारांवर शिखर बँक घोटाळ्याच्या चौकशीची टांगती तलवार कायम, क्लिनचीट विरोधात अण्णा हजारे यांचा आक्षेप - Shikhar Bank Scam
- नरेंद्र मोदी यांची तिसरी पंतप्रधान पदाची कारकीर्द खडतर; एनडीएतील घटक पक्षांना गृहित धरून चालणार नाही - Brand Modi Faces Turbulence
- नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पारख हरल्यानंतरच होते, आता जिंकेपर्यंत हार-फुले नाहीत-देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis News