कोल्हापूरHelp To Vishalgarh Victims :जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी विशाळगडाच्या जवळ असलेल्या गजापूर गावातील नुकसानग्रस्तांना दिलेली मदत म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे. कोल्हापुरात जातीय दंगली घडतील असं वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केलं होतं. त्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे. तसंच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शिवभक्तांचा उल्लेख अतिरेकी असा केला, हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी दिलीय. कोल्हापूरच्या राजघराण्यात दोन भूमिका कशा? असा सवालही महाडिक त्यांनी यावेळी उपस्थित केला. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तेव्हा अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला स्थगिती का दिली :महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत आहे की, अतिक्रमण केलेल्या नागरिकांसोबत हे त्यांनी जाहीर करावं, असं म्हणत माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी सगळं खापर प्रशासनावर फोडलं; मात्र विशाळगडावरील अतिक्रमण आताचं नाही तर 15 ते 20 वर्षांपूर्वीचं आहे. तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार होतं. तुम्ही गृहराज्यमंत्री होता तेव्हा या अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला स्थगिती का दिली? असा सवालही खासदार महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना विचारला. अतिक्रमण काढण्यासाठी निघालेल्या माजी खासदार संभाजीराजेंना प्रशासनाने का थांबवलं नाही, अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी केली होती. मी त्यांना विचारतो तुम्ही का त्यांना थांबवलं नाही? कोल्हापूरच्या राजघराण्यात दोन भूमिका कशा असू शकतात. एकानं म्हणायचं पाडा आणि दुसऱ्यांनी म्हणायचं पाडू नका. आज वर्तमानपत्रात खासदार शाहू महाराज कान धरून उभे राहिले हे पाहून खूप वाईट वाटलं; कारण शाहू महाराज हे आमचे श्रद्धास्थान आहेत, असंही धनंजय महाडिक यांनी सांगितलं.