मुंबई Nitesh Rane Slams Manoj Jarange :राज्यात ओबीसी आणि मराठा आंदोलनावरुन चांगलाच वाद पेटलेला आहे. त्यावरुन आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या हिताचं बोलाल तर समर्थन, परंतु राजकीय बोलाल, तर जशास तसं उत्तर दिलं जाईल," असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. नितेश राणे हे आज मुंबईत बोलत होते.
जर भाषा राजकीय आणि निवडणुकीची असेल :याप्रसंगी बोलताना नितेश राणे म्हणाले की, "दोन दिवसापूर्वी मी मनोज जरांगे यांना मोहम्मद अली जिन्नाची उपमा दिली. तेव्हा महाविकास आघाडीतील आणि त्याला समर्थन करणाऱ्या ब्रिगेडी लोकांना ते फार झोंबलं. पण, या मागची कारण आहेत. आम्ही पहिल्या दिवसापासून एकच बोलत आहोत, आमचा मराठा समाजाला पाठिंबा आहे. आम्ही पण मराठा आहोत. जिन्ना ने हिंदू - मुस्लिमांमध्ये फूट पाडली. तीच भूमिका मनोज जरांगे घेत असतील, तर आमचा विरोध आहे. आज मनोज जरांगे यांची भाषा एका राजकीय नेत्यांची आहे. ते फक्त देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका करत आहेत. महाविकास आघाडीवर ते काहीच बोलत नाहीत. मनोज जरांगे तुम्ही मराठा समाजाच्या हिताचं बोलाल तर समर्थन देऊ, मात्र राजकीय बोललं तर विरोधच असेल," असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे. नितेश राणे पुढे म्हणाले की, "मराठा आरक्षणावरून सुरु झालेलं आंदोलन आता पाडापाडीवर गेलंय. मनोज जरांगे तुम्ही समाजावर बोला, राजकारण नको. जर भाषा राजकीय आणि निवडणुकीची असेल, तर निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर दिलं जाईल," असा सज्जड इशारा सुद्धा नितेश राणे यांनी दिला आहे.