ठाणे BJP MLA Ganpat Gaikwad Firing Incident : पोलीस ठाण्याच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीनं कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केल्याचं स्पष्टीकरण भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी दिलं आहे. माझ्या मुलांना पोलीस ठाण्यामध्ये मारहाण होत होती. त्यामुळं माझ्यासमोर पर्याय नव्हता. पोलिसांसमोर माझ्यावर जर कुणी हल्ला करत असेल, तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी असं करणं गरजेचं होतं, अशी कबुलीच आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांना दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात गुन्हेगार पाळून ठेवले :आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. "एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचं काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले, तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवलं आहे," असा आरोपही त्यांनी केला.