नंदुरबार– नंदुरबार विधानसभा निवडणुकीकरिता अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवार अर्ज दाखल करणाऱ्या हिना गावित यांनी पुन्हा एकदा भाजपाला धक्का दिला. हिना गावित यांनी भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राजीनामा देण्याचं कारणही पत्रकार परिषदेत सांगितलं.
डॉ. हिना गावित आपली बाजू मांडताना म्हणाल्या, "लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे स्थानिक नेते महायुतीशी गद्दारी करीत आहेत. याबाबत मी भाजपाच्या आणि शिवसेनेच्या वरिष्ठांकडे तक्रारदेखील केली होती. मात्र, त्यांना न जुमानता नंदुरबार विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्याला भाजपा उमेदवारासमोर उभे केले. त्यामुळे मी अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी दाखल केली."
हिना गावित यांचा शिवसेना नेत्यांवर आरोप-भाजपाच्या प्रवक्त्या हिना गावित यांनी म्हटले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आदर्श मानून 2014 पासून मी भाजपात कार्यरत राहिले. लोकसेवा आणि राष्ट्रसेवा यांचे धडे घेत चांगले कार्य करू शकले. परंतु, आमच्या मित्रपक्षाकडून स्थानिक स्तरावर सातत्यानं मनोबल तोडण्याचं कार्य सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीमधील भाजपाचे मित्र पक्ष सातत्यानं गावित परिवाराच्या विरोधात भूमिका घेऊन षडयंत्र रचत असतात. विशेषतः महाराष्ट्राच्या महायुतीमधील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे जिल्हा नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे भाजपा विरोधातील प्रमुख काँग्रेस पक्षाला नेहमी शक्ती पुरवून अडचणी निर्माण करत असतात. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मला उमेदवारी मिळू नये, इथपासून मला पराभूत करण्यापर्यंत त्यांनी भूमिका बजावली. तरीही पक्षीय स्तरावरून त्यांना आवर घालण्यात आला नाही."
नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षात मी कार्यरत असताना सलग दोन टर्म नंदुरबार लोकसभा मतदार संघातून मी दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. परंतु 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षाकडून वारंवार गद्दारी होत असल्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे-भाजपा नेत्या, हिना गावित
चांगला हेतू ठेवून उमेदवारी मागितली- "नंदुरबार विधानसभा मतदारसंघात उघडपणे काँग्रेस उमेदवारासाठी मनुष्यबळ देणे, धनशक्ति पुरवणे आणि जागोजागी बैठका घेऊन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या पराभवासाठी तयारी चालवणं त्यांनी सुरू ठेवलं आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून जर मी निवडणूक लढवली तर भारतीय जनता पार्टीचा म्हणजे महायुतीचा एक आमदार वाढू शकतो. हा चांगला हेतू ठेवून मी उमेदवारी मागितली. तरीही शिवसेनेचे जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी त्या जागेचा आग्रह धरला. त्या पक्षाचा उमेदवार उभा करण्याची खेळी केली," असा आरोप गावित यांनी केला.
वरिष्ठांची अडचण होऊ नये, म्हणून...हिना गावित यांनी पक्षाचा राजीनामा देण्यामागं भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, "सर्व राजकीय घटनाक्रम आपल्या आणि पक्षातील वरिष्ठांना वेळोवेळी निदर्शनास आणून दिल्या आहेत. मात्र या परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून मी दाखल केलेली अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम राहणार आहे. परंतु भारतीय जनता पार्टीची जबाबदार सदस्य असताना माझ्या या भूमिकेमुळे महायुतीमधील वातावरण बिघडू शकते. घटक पक्षांमधील अंतर वाढण्याला मी कारणीभूत ठरू शकते. हे लक्षात आल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातून बाहेर पडताना मला विलक्षण दुःख आणि वेदना होत आहेत."
हेही वाचा-
- "शिवसेनेच्या उमेदवाराला हरवून सरकारमध्ये सहभागी होणार ", हिना गावित यांनी स्पष्टच सांगितलं
- 'ईटीव्ही भारत'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेनं पालघरमधून राजेंद्र गावितांना दिली उमेदवारी, विलास तरे बोईसरमधून रिंगणात