बारामती (पुणे):बस स्थानकात नागरिकांना अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळणं गरजेचं आहे. विकासकामंही भविष्यातील गरजा ओळखून होणं अपेक्षित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्या बसस्थानकाच्या जागी अत्याधुनिक नवीन बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेतला होता. पन्नास कोटी रुपये खर्चून हे बसस्थानक उभारलं आहे. १३ जून २०२१ रोजी या बसस्थानकाचं काम सुरू झालं आणि २ मार्च २०२४ मध्ये हे काम पूर्णत्वास गेलंय. विमानतळाच्या धर्तीवर याचा आराखडा बनविलेला असून एकाच वेळेस फलाटावर २२ तर रात्री मुक्कामासाठी ८० बस येथे उभ्या राहू शकणार आहेत.
बऱ्हाणपूरमध्ये पोलीस मुख्यालय साकारले:पुणे जिल्ह्यातील पोलीस दलाची वेगवान हालचाल व्हावी, प्रशिक्षण आणि इतर मूलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशानं बारामती येथील बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय साकारण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यातील दक्षिणेकडील हद्दीपर्यंत बंदोबस्त द्यावा लागल्यास बंदोबस्त पोहोचण्यास विलंब होतो. यासाठी बऱ्हाणपूर येथे पोलीस उपमुख्यालय निर्माण झाल्यास कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल. यासह परिस्थिती नियंत्रणात आणणं सहजतेनं शक्य होईल, या उद्देशानं हे उपमुख्यालय निर्माण करण्यात आलं आहे. दुसरीकडे बारामतीतील पोलीस लाईन मधील पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली होती. पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याही वाढल्यानं प्रत्येक पोलिसाला निवासस्थान चांगलं असावं, या उद्देशानं नवीन इमारती उभारण्याचा निर्णय झाला. बारामतीतील बहुसंख्य पोलीस कर्मचाऱ्यांना येथे चांगल्या दर्जाची घरं उपलब्ध झाली आहेत.
दृष्टीक्षेपात पोलीस उपमुख्यालय :
• प्रशासकीय इमारत
• पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक निवासस्थान
• सायबर पोलीस स्टेशन
• विश्रामगृह
• आर.पी.आय. इमारत
• प्रशिक्षण केंद्र
• मुले आणि मुलींचे वसतिगृह
• बहुउद्देशीय सभागृह
• मोटार ट्रान्सपोर्ट वर्कशॉप
• अंतर्गत रस्ते, परेड ग्राऊंड
दृष्टिक्षेपात बस स्थानक :
• एका वेळेस २२ बस प्लॅटफॉर्म थांबविण्याची क्षमता
• प्लॅटफॉर्मची २४ हजार फुट लांबी
• ५६ बसची पार्किंग व्यवस्था
• प्रवाशासाठी स्वतंत्र पार्किंग
• बस स्थानकालगत बस डेपो
• हिरकणी कक्ष
• ३० दुकाने
• वाहक-चालक आराम कक्ष
• कॉन्फरन्स/सेमिनार हॉल
• अधिकारी विश्रामगृह