मुंबई Badlapur Rape Case Accused Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. अक्षय शिंदेला बदलापूर येथे घेऊन जात असताना, त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळी झाडली. यावेळी पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचं समोर आलंय. अक्षयला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याचा मृत्यू झाला.
मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार : अक्षयचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्याच्या आई आणि भावानं नकार दिलाय. अक्षयची आई आणि भाऊ रुग्णालयात दाखल झाले. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. आम्ही अक्षय शिंदेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. आम्हाला पोलिसांवरती संशय आहे. या प्रकरणाला पोलीस आणि शाळा व्यवस्थापनच जबाबदार आहे. जेलमध्ये असताना पोलिसांनी त्याला खूप मारलं. हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांनी त्याला ठार मारलं असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला.
पोलीस कर्मचारी जखमी : मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय शिंदे हा तळोजा कारागृहात होता. तेथून त्याला पोलीस बदलापूर येथे घेवून जात होते. यावेळी आरोपीनं सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली व त्यांच्यावरच गोळ्या झाडल्या. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झालेत. पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात नराधम आरोपी अक्षय शिंदेचा गेम झाला.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणं सर्व घटनाक्रम जशासतसा : तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे न्यायबंदी असलेला आरोपी अक्षय अण्णा शिंदे यास बदलापूर पूर्व पोलीस ठाणे विविध गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे येथील पोलीस अधिकारी व पथक हे तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे ट्रान्सफर वॉरंटसह गेले होते. प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी 5.30 वा. सदर आरोपी यास पोलीस पथकानं तळोजा मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेतले व त्यास घेवून ठाणे येथे येत असताना, सुमारे 06.00 वा. ते 6.15 वा. दरम्यान पोलीस वाहन मुंद्रा बायपास येथे आले. सदर आरोपीने पथकातील पोलीस अधिकारी सपोनि / निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तूल खेचून घेतले व पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 01 राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला व दोन राऊंड इतरत्र फायर झाले.