ठाणे Accused Akshay Shinde Death : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळच्या दरम्यान त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला. अक्षयनं पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल, दुसऱ्या अधिकाऱ्यानं त्याच्यावर गोळी झाडली, ज्यामुळं तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेलं असता त्याचा मृत्यू झाला. बदलापूर प्रकरणाच्या तपासादरम्यान पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यावेळी तिनं अक्षयवर गंभीर आरोप केला होता. त्या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अक्षयला घेवून जात होते.
पहिल्या पत्नीचा नेमका आरोप काय? : बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी 'एसआयटी'ची स्थापना केली होती. एसआयटीनं या प्रकरणाबाबत अक्षयच्या पहिल्या पत्नीचाही जबाब नोंदवला होता. आरोपी अक्षयनं एकूण तीन लग्न केली होती. त्याची पहिली पत्नी त्याला लग्नाच्या पाच दिवसांतच सोडून गेली होती. तिनं अक्षयवर बलात्कार आणि मारहाणीचा आरोप केला होता. अक्षयच्या पहिल्या पत्नीनं दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात चौकशीसाठी सोमवारी बदलापूर पोलीस अक्षयचा ट्रान्झिट रिमांड घेण्यासाठी तळोजा कारागृहात गेले होते. या दरम्यान अक्षयनं एका पोलिसाची बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल, दुसऱ्या अधिकाऱ्याकडून त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.
आरोपीच्या पहिल्या पत्नीनं बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्याबाबत तपासासाठी पोलीस वॉरंटसह आरोपीला तळोजा कारागृहातून पोलीस ठाण्यात घेवून जात होते. यावेळी त्यानं पोलिसांची बंदूक घेत पोलिसांसह हवेत गोळी मारली. यात त्याचा मृत्यू झाला. विरोधक हे प्रत्येक गोष्टीचं राजकारण करतात. आरोपीला फाशी द्यावी यासाठी हेच विरोधक आक्रमक झाले होते. तर आता त्या आरोपीचा मृत्यू झालाय तर हेच विरोधक यावरुन राजकारण करत आहेत. - देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री