छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने मराठा साम्राज्य काबीज करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोदेखील अयशस्वी ठरला. राजाराम महाराज आणि नंतर ताराराणी यांनी मुघलांना झुलवले, या संघर्षात औरंगजेबाचा नैसर्गिक मृत्यू झाला. मराठा साम्राज्यावर विजय मिळवण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या ऊर्जेमुळे आशिया खंडाचा बादशाह ही सत्ता मिळवण्यासाठी तो आला, मात्र परत गेलाच नाही, अशी माहिती इतिहास अभ्यासकांनी दिलीय.
औरंगजेब 27 वर्ष दख्खनमध्ये लढला, मात्र मिळवता आले नाही 'स्वराज्य' - AURANGZEB FOUGHT IN THE DECCAN
छत्रपती संभाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या ऊर्जेमुळे आशिया खंडाचा बादशाह ही सत्ता मिळवण्यासाठी तो आला, मात्र परत गेलाच नाही, अशी माहिती इतिहास अभ्यासकांनी दिलीय.

Published : Feb 24, 2025, 6:48 PM IST
|Updated : Feb 24, 2025, 7:49 PM IST
दिल्लीवरून येण्याची होती दोन कारणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसाला एक स्वप्न दाखवलं ते होते स्वराज्याचे. मराठी माणूस बलाढ्य मुघलांना हरवू शकतो, असा विश्वास त्यांनी निर्माण केला होता. महाराजांचे निधन झाले त्यानंतर आता दख्खनवर आपल्याला ताबा मिळवणे शक्य होईल असं मुघल सैन्याला वाटत होतं. दरम्यान औरंगजेबाचा मुलगा दुसरा अकबर याने बापाच्या विरोधात बंड पुकारले आणि तो महाराष्ट्रात आला. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला अभय दिले अन् मदत केली. त्याचा राग मनात धरत औरंगजेबाने आपल्या मुलाचा बदला घेण्यासाठी आणि मराठा साम्राज्य मिळवण्यासाठी साधारणतः 1681 मध्ये तो महाराष्ट्रात आला, अशी माहिती इतिहास अभ्यासक डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिली.
महाराजांच्या निधनानंतर लागला नाही निभाव :छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मराठा साम्राज्य उभे केले. अनेक किल्ले त्यांनी निर्माण केले. त्यांच्या निधनानंतर राज्यात आपली सत्ता मिळवता येईल, असं औरंगेजबाला वाटलं आणि ती 1681 मध्ये महाराष्ट्रात म्हणजेच दख्खनमध्ये दाखल झाला. त्यांना पुढे नऊ वर्षे छत्रपती संभाजी महाराजांनी झुलवले. सोपा वाटणारा लढा आव्हानात्मक केला, दगाफटका झाल्याने संभाजी महाराज पकडले गेले, त्यांच्या मृत्यूनंतर आता हा भाग आपलाच झाला, असं औरंगजेबाला वाटत होतं. औरंगजेबाने जुल्फिकार खानाला रायगड जिंकण्यासाठी पाठवलं, त्याला वाटलं आपण सहज किल्ला जिंकू, मात्र तसे झाले नाही. मार्च महिन्यात त्याने रायगडावर चढाई केल्यावर नोहेंबर महिन्यात त्यांना किल्ला जिंकता आता. पण तोपर्यंत छत्रपती राजाराम महाराज किल्ल्यातून निसटले होते, अशी माहिती इतिहास अभ्यासक आदित्य वाघमारे यांनी दिलीय.
27 वर्ष लढला पण जिंकला नाही औरंगजेब :1681 मध्ये औरंगजेब दख्खनमध्ये आला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर साधारणतः 10 ते 11 वर्ष छत्रपती राजाराम महाराज यांना त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्वसामान्यांमध्ये इतकी ताकद निर्माण केली होती की, राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यावर असताना औरंगजेबाच्या सैन्याला नामोहरम करून सोडलं होतं. त्यांचे इतके हाल केले की, अक्षरशः भीक मागून त्यांना खावं लागलं, त्यांचे मनोबल खच्चीकरण केलं. मुघल सैन्य किल्ला जिंकायचे किंवा मराठे युद्ध टाळून ते देऊन टाकायचे, असे ते किल्ले मराठ्यांना परत मिळवले. राजाराम महाराजांच्या अपघाती निधनानंतर त्यांची पत्नी ताराराणी यांनी वेळ ओळखून राज्य आपल्या ताब्यात ठेवत युद्ध सुरूच ठेवलं आणि राज्य अबाधित ठेवलं. औरंगजेबाने 27 वर्षे लढा सुरू ठेवला, अखेर त्याचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. मात्र त्याला दख्खन जिंकता आले नाही, अशी माहिती इतिहास अभ्यासक आदित्य वाघमारे यांनी दिली.
जिंकण्याचे स्वप्न भंगले : औरंगजेब हा आशिया खंडाचा राजा होता, त्याचं मोठं वलय त्याने निर्माण केलं होतं. दख्खन आपल्या ताब्यात असावे म्हणून तो वयाच्या 62 व्या वर्षी महाराष्ट्रात आला. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी यांच्या चिवट लढ्याने तो अपयशी ठरला. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर त्याचे स्वप्न भंगले. तो युद्ध जिंकत होता, मात्र लढाई हरत होता, म्हणजेच तो एका ठिकाणी जिंकायचा पुढे गेला की मराठे तो भाग पुन्हा जिंकून घ्यायचे. पुढे पाठ मागे सपाट, असे हाल औरंगजेबाचे केले. जग जिंकणारा बादशाह दख्खन जिंकू शकला नाही. 27 वर्ष लढूनही त्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा खुलताबाद येथे दफनविधी करण्यात आला, अशी माहिती इतिहास अभ्यासक डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिलीय.
हेही वाचा -