अमरावती : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आता बुधवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या आहेत. त्यामुळं आता येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे. तर दुसरीकडं प्रताप अडसड यांच्या बहिणीवर सोमवारी हल्ला झाल्याचा आरोप आहे. अर्चना रोटे यांच्या हातावर चाकूने वार देखील करण्यात आल्याचा आरोप आहे. सातेफळ फाटानजीक हा हल्ला झाल्याची माहिती कळताच धामणगाव रेल्वे मतदारसंघात खळबळ उडाली. सातेफळ येथील भाजपा कार्यकर्ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या अर्चना रोटे यांना चांदुर रेल्वे येथील डॉक्टर ढोले यांच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्या हातावर गंभीर जखम झाली असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी अमरावतीत हलवण्यात आल्याची माहिती प्रताप अडसड यांनी दिली.
प्रताप अडसड यांचं कार्यकर्त्यांना आवाहन : "या घटनेमुळं कार्यकर्त्यांनी घाबरू नये किंवा कुठल्याही प्रकारचा गोंधळ घालू नये. प्रत्येकानं आपलं गाव सोडून इतर कुठेही जाऊ नये. हा संपूर्ण प्रकार आपण गोंधळ घालावा यासाठी विरोधकांनी रचलेला कट असू शकतो," अशी शंका प्रताप अडसड यांनी व्यक्त केली. "सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या गावातच शांत राहावं आणि निवडणुकीच्या दिवशी आपल्या मतदारांना बाहेर काढावं," असं आवाहन देखील प्रताप अडसड यांनी केलं.