महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपराजधानी बनतेय गुन्हेगारांची राजधानी? माजी नगरसेवकावर 8 ते 10 जणांचा प्राणघातक हल्ला

Attack on Ex Corporator : राज्याची उपराजधानी नागपुरात एका माजी नगरसेवकावर 8 ते 10 जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आलीय. या हल्ल्यात नगरसेवक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कामठी इथं एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

माजी नगरसेवकावर 8 ते 10 जणांचा प्राणघातक हल्ला
माजी नगरसेवकावर 8 ते 10 जणांचा प्राणघातक हल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 12:00 PM IST

नागपूर Attack on Ex Corporator : शहरालगत असलेल्या कामठी इथं एका माजी नगरसेवकावर 8 ते 10 जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आलीय. दिलीप बांडेबुचे असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे. हल्लेखोरांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दंडुक्यानं त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

घरी जाताना प्राणघातक हल्ला : माजी नगरसेवक दिलीप बांडेबुचे बुधवारी रात्री उशीरा जिम बंद करुन घरी निघाले होते. घर जवळच असल्यानं ते पायी जाणं येणं करायचे. रोजच्या सवयी प्रमाणं ते घरी जाण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी 8 ते 10 जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दांड्यानं त्यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. दिलीप बांडेबुचे यांनी हल्लेखोरांचा प्रतिकार केला. तसंच त्यांनी आरडाओरडा सुरु केला. अचानक ओरडण्याचा आवाज येत असल्यानं परिसरातील नागरिक घराबाहेर पडले. त्यामुळं सर्व हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर स्थानिकांच्या मदतीनं जखमी दिलीप बांडेबुचे यांना उपचारासाठी कामठीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

जुन्या वादातून हल्ला : माजी नगरसेवक दिलीप बांडेबुचे यांच्यावर जुन्या वादातून हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी त्यादृष्टीनं तपास सुरु केलाय. विशेष म्हणजे दिलीप बांडेबुचे यांच्या जिम बाहेर काही गुन्हेगारी वृत्तीचे तरुण घोळका करुन बसायचे, दिलीप यांनी त्यांना अनेकदा हटकले होते. त्यातून हल्ला झाला का, याचा पोलीस तपास करत आहेत. तसंच त्यांचा आणखी कुणासोबत वाद झाला होता का, याचाही शोध कामठी पोलीस घेत आहेत.

22 दिवसात 12 हत्या : राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर शहर मात्र गुन्हेगारीत राज्याची राजधानीचं ठरत असल्याचं दिसतंय. गेल्या 22 दिवसांच्या कालावधित नागपूर शहरात 12 हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात दोन दुहेरी हत्याकांडाचा देखील समावेश आहे. शहरात 22 दिवसांमध्ये नागपुरात 12 खुनाच्या घटना घडल्यानं नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल हे अद्याप आपल्या कामाचा ठसा उमटवू शकलेले नाहीत. नागपूरच्या गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती कमी झाल्याचं चित्र भासू लागलंय. दोन वर्षांपूर्वी नागपूर पोलिसांनी याच फेब्रुवारी महिन्यात शून्य हत्येची नोंद करुन एक नवीन रेकॉर्ड तयार केला होता. तर यंदा मात्र, हत्येच्या घटनांचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत निघण्याची परिस्थिती निर्माण झालीय.

हेही वाचा :

  1. 'ईनाडू कार्यालयावर हल्ला हा लोकशाहीवरील डाग', आंध्रप्रदेश सरकारवर सर्वस्तरातून टीकेची झोड
  2. शिवजयंतीचे पोस्टर लावण्याचा वादातून धावत्या दुचाकीवरच मित्रावर सपासप वार, नाशकात खुनाचा थरार

ABOUT THE AUTHOR

...view details