मुंबईCaste Equations In Mumbai:लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आता अत्यंत जोरदारपणे सुरू आहे. शेवटच्या दिवसातील प्रचाराला वेग आला आहे. या निवडणुकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या सभांमधून आणि प्रचार यात्रांमधून उमेदवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते तसंच पक्षांचे दिग्गज नेते आपलं मत मांडत आहेत. या मुद्द्यांचा परामर्ष घेतला तर तर सर्वच पक्षात कमी अधिक प्रमाणात तेच तेच मुद्दे मतदारांसमोर मांडत असतात, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केली आहे. जोशी म्हणतात की, शिवसेनेच्यावतीनं मुंबई बाहेर गेलेले उद्योग मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा होत असलेला डाव तसंच पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती या बाबींवर लोकांसमोर जात आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील धारावी, बीडीडी चाळ, जुन्या चाळी तसंच झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न मांडले जात आहेत. हिंदू-मुस्लिम समीकरण, कसाब बाबतच्या आणि 26/11 हल्ल्या बाबतच्या मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चर्चा केली जात आहे तर मराठी-गुजराती मुद्दासुद्धा प्रचारात मांडला जात आहे, असं ते म्हणाले.
पुन्हा जातीय भाषिक समीकरणे :या निवडणुकीत नेहमीप्रमाणे जातीय भाषिक समीकरणे राजकीय पक्षांनी मांडायला सुरुवात केली आहे. मराठी-गुजराती भाषिकांचा मुद्दा महत्त्वाचा असून गुजराती भाषिकांचं ध्रुवीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो मुंबईत करण्यात आला. तर ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मुंबईतील काही दलित वस्त्यांमध्ये सभा घेऊन दलितांची मतं एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मत आम आदमी पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष ॲड. धनंजय शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने मराठी भाषिक आणि मुस्लिम तसंच दलित मतांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.
काय आहे मुंबईतील जातीय गणित?मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक असून त्यांची संख्या 34 टक्के आहे. त्या पाठोपाठ उत्तर भारतीय मतदारांची संख्या 19%, मुस्लिम मतदारांची संख्या 16%, गुजराती मतदारांची संख्या 14%, हिंदू दलित मतदारांची संख्या 8%, दक्षिण भारतीयांची 4% टक्के आणि अन्य मतदारांची संख्या 5% टक्क्यांच्या आसपास आहे.
लोकसभा मतदारसंघ निहाय जातीय समीकरण?दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अत्यंत संमिश्र अशी मतदार रचना आहे. या मतदारसंघात सर्वाधिक मुस्लिम मतदार असून ते 25 टक्के आहेत. त्या पाठोपाठ दलित मतदार सात टक्के तर बौद्ध मतदार साडेचार टक्के आहेत. जैन मतदारांची संख्या साडेपाच टक्के, ख्रिश्चन मतदारांची संख्या तीन टक्के तर शीख मतदारही काही प्रमाणात आहेत.