मुंबई -राज्यात १५ व्या विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले गेले असून, २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन राज्यातील जनता कोणाच्या बाजूने कौल देते ते स्पष्ट होणार आहे. महायुती आणि महाविकास यांच्यातील सहा पक्ष राज्यात प्रमुख भूमिकेत असले तरीसुद्धा सध्याची राजकीय परिस्थिती पाहता छोट्या घटक पक्षांनाही फार महत्त्व आलंय. मागील लोकसभा निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यासोबत गेलेले हे पक्ष यंदा स्वतःच्या जोरावर विधानसभेच्या आखाड्यात आपली ताकद आजमावणार असल्याने राज्यात अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होऊन धक्कादायक निकालाची शक्यता वर्तवली जात आहे.
घटक पक्षांना सुगीचे दिवस:महायुती असो अथवा महाविकास आघाडी त्यांच्यासोबत असलेल्या घटक पक्षांना जागा देण्याच्या मुद्द्यावरून जागा वाटपाचं घोडं अद्याप अडलेलं आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी बैठकांचं सत्र वारंवार सुरू असून, छोट्या घटक पक्षांचा दबावही मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. प्रहार संघटनेचे बच्चू कडू, स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी आणि संभाजी राजे यांनी महायुतीविरोधात तिसऱ्या आघाडीच्या रूपाने आवाज उठवलाय. जयंत पाटील यांची शेकाप, समाजवादी पार्टी, डावे पक्ष हेसुद्धा महायुतीच्या विरोधात मैदानात आहेत. तर सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती, विनय कोरे यांचा जनसुराज्य, रामदास आठवले यांची रिपाइं हे पक्ष महायुतीच्या बाजूने आहेत. अशात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने नेहमीच निर्णय प्रसंगी हितसंबंध जपत त्या त्या आघाडीला पाठिंबा दिलाय. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसला नसला तरी विधानसभेत वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात मते घेणार आणि याचा फटका दोन्ही आघाड्यांना बसण्याची जास्त शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती सोबत गेलेल्या महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने यंदा जागावाटपात भाजपासोबत चर्चा फिस्कटल्याने स्वतःची स्वतंत्र चूल मांडलीय.
यामुळे या सर्वच घटक पक्षांना यंदाच्या निवडणुकीत सुगीचे दिवस आलेत.
पक्षांतर्गत इच्छुक उमेदवारांचं काय करायचं?:एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडामुळे राज्यात चार प्रमुख पक्षांचे सहा पक्ष झालेत. अशातच या प्रमुख पक्षांमध्येच उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेत. एकीकडे नाराज उमेदवारांची समजूत काढताना दुसरीकडे घटक पक्षांनाही योग्य तो सन्मान देण्यासाठी प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या नाकी नऊ आलेत. या निवडणुकीत ज्यांची उमेदवारी डावलली गेली आहे किंवा ज्या कार्यकर्त्यावर अन्याय झालाय. त्यांच्याबद्दल मला तीव्र वेदना असून, सरकार आल्यावर त्याची भरपाई केली जाईल, अशी जाहीर कबुली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. म्हणूनच मित्र पक्षांसाठी जागा सोडत असताना पक्षांतर्गत इच्छुक उमेदवारांचं काय करायचं? असा प्रश्न आता महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूला निर्माण झालाय.