मुंबई Ashok Chavan:भाजपाकडून राज्यसभेसाठी अशोक चव्हाण यांना उमेदवारी घोषित केल्याबद्दल त्यांनी भाजपातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. (Rajya Sabha Election 2024) माझ्यासारख्या पक्षात नवख्या असलेल्या नेत्याला इतकी मोठी जबाबदारी दिल्याबद्दल मी वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो, अशी पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ते आज (14 फेब्रुवारी) मुंबईत बोलत होते.
अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस:महाराष्ट्रातील राज्यसभेसाठीच्या ६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या ६ जागांपैकी भाजपाच्या वाटेला ३ जागा आहेत. उद्या राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. आज भाजपाकडून राज्यसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी तसेच नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांचा समावेश आहे. भाजपाकडून राज्यसभेसाठी अनेक इच्छुक नेत्यांची नावे चर्चेत असताना कालच भाजपावासी झालेले अशोक चव्हाण यांची वर्णी राज्यसभेसाठी लागल्यानं अशोक चव्हाण यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. याकरिता त्यांनी भाजपा पक्षश्रेष्ठींचे आभारही मानले आहेत.
विश्वास सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न:याप्रसंगी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, "राज्यसभेसाठी भाजपानं उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संपूर्ण पक्षाचा मी मनःपूर्वक आभारी आहे. ही माझ्यावर सोपवलेली मोठी जबाबदारी आहे. माझ्यावर मोठा विश्वास दर्शविण्यात आला आहे. तो विश्वास सार्थ ठरविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन."