मुंबई Arya Gold Company : महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन माणसाला नोकरीत 'नो एन्ट्री' म्हणणाऱ्या मुंबईतील आर्या गोल्ड (Arya Gold) कंपनीच्या मालकाने महाराष्ट्राची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची माफी मागत वेबसाईटवरील जाहिरात हटवली आहे.
नॉन महाराष्ट्रीयन : नोकरी विषयक माहिती देणाऱ्या एका वेबसाईटवर जॉब संदर्भात एक पोस्ट करण्यात आली होती. मुंबईतील मरोळ भागातील 'आर्या गोल्ड' नावाच्या संस्थेत डायमंड कारखान्यात प्रोडक्शन मॅनेजरची नोकरी असल्याची जाहिरात पोस्ट करण्यात आली होती. पोस्टमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवाराची पात्रता काय असेल हे देखील नमूद करण्यात आलं होतं. ज्यात 25000 रुपये ते 62760 रुपये पर्यंत वेतन दिलं जाणार असं नमूद होतं. मात्र, उमेदवार हा 'नॉन महाराष्ट्रीयन' असावा अशी अट घालण्यात आली होती. तसेच उमेदवाराला पाच वर्षाचा अनुभव असावा. दिवसाच्या शिफ्टमध्ये काम करावं लागेल अशा प्रकारची माहिती नमूद करण्यात आली होती. मात्र, मुंबईतील मराठी माणसाला डावलून नॉन महाराष्ट्रीयन शब्दामुळं मुंबईतील राजकारण तापलं होत. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होत 'आर्या गोल्ड' कंपनीसमोर जाऊन आपला रोष व्यक्त केला.
माफीनामा पत्रात काय?: "सन्माननीय राज ठाकरे आणि संपूर्ण महाराष्ट्र मी बंटी रूपरेजा आर्या गोल्ड कंपनीचा मालक आपली जाहीर माफी मागतो. जॉबसाठी मॅनेजर पदासाठी ऑनलाइन जाहिरात दिली होती. शिकावू व्यक्तीकडून जाहिरातमध्ये नकळत काम करताना नॉन महाराष्ट्रीयन हा शब्द गेला होता. त्यात सुधारणा केली असून सदरची जाहिरात आम्ही हटवली आहे. महाराष्ट्रातील जनतेचा भावना दुखवायचा उद्देश नाही. झालेल्या चुकीबद्दल मी कंपनीच्या मालक या नात्याने सर्व महाराष्ट्राची माफी मागतो".