नवी दिल्ली Arvind KeJriwal Press Conference : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कारागृहातून सुटल्यानंतर हनुमानाचं दर्शन घेत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी कोणतीच कसर सोडली नव्हती. मात्र मी मात्र संघर्ष केला आणि यांना पुरुन उरलो. केवळ हनुमानाच्या आशीर्वादानं मी कारागृहातून बाहेर आलो," असं त्यांनी स्पष्ट केलं.
भाजपाचा आगामी पंतप्रधान कोण असेल :देशात लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक प्रचारात भाजापाचे नेते इंडिया आघाडीवर पंतप्रधान पदावरुन जोरदार टीका करत आहेत. मात्र अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. "तुम्ही 'इंडिया' आघाडीला विचारता तुमचा आगामी पंतप्रधान कोण असेल. मात्र आज मी तुम्हाला विचारतो एनडीएचा आगामी पंतप्रधान कोण असेल," असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता 75 वर्षाचे होत आहेत. त्यांनीच भाजपामध्ये नेता 75 वर्षाचा झाल्यानंतर निवृत करण्याचं धोरण आणलं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाजुला होऊन काही दिवसातच योगी आदित्यनाथ यांचा पत्ता कट करतील. त्या जागेवर नरेंद्र मोदी यांचे कट्टर साथिदार अमित शाह यांना पंतप्रधान करतील," असंही अरविंद केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भाजपाला लोकशाही संपवायची आहे :भाजपानं देशभरात तानाशाही सुरू केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये त्यांना कमी जागा मिळणार आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी सगळ्याच राज्यात भाजपाची पिछेहाट होत आहे. भाजपाला लोकशाही संपवायची आहे. मात्र आम आदमी पार्टी याला जोरदार विरोद करत असल्यानं त्यांनी मला कारागृहात पाठवलं, अशी टीकाही अरविंद केजरीवाल यांनी यावेळी केली.