मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. म्हैसाळ उपसा सिंचन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली. तर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये ३४६ नवीन पदं भरती केली जाणार आहेत. विशेष म्हणजे राज्यात लवकरच सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापनाला जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला.
वरखेडे लोंढे बॅरेज आणि म्हैसाळ उपसा सिंचन -म्हैसाळमधील उपसा सिंचन योजनेत ऊर्जा कार्यक्षमता वाढवणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ३९८ दशलक्ष युनिट विजेची गरज भागवली जाणार आहे. कोयना, कृष्णा उपसा सिंचन प्रकल्पामध्ये म्हैसाळ आणि ताकारी अशा दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. दुसरीकडे जलसंपदा विभागाअंतर्गत जळगावातील वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी १ हजार २७५ कोटी रुपयांची बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा पाणीसाठा ३५.५८७ द.ल.घ.मी इतका आहे. या प्रकल्पामुळे चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हा प्रकल्प तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत आहे.