अमरावती Comrades Marathon : धावण्याच्या स्पर्धेतील अतिशय कठीण समजली जाणारी कॉमरेड्स मॅराथॉन स्पर्धा दक्षिण आफ्रिकेतील डरबन इथं 9 जून रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून 323 स्पर्धक सामील होत असून त्यात अमरावतीच्या सहा जणांचा समावेश आहे. 4 जून रोजी सायंकाळी अमरावतीहून मुंबईसाठी प्रस्थान करुन ते डरबन इथं पोहोचणार असल्याची माहिती अमरावती रोड रनर्सचे मुख्य मार्गदर्शक तथा अमरावती हाफ मॅराथॉनचे संचालक प्रशिक्षक दिलीप पाटील यांनी दिलीय.
अमरावतीमधून कोण होणार सहभागी : दिलीप पाटील यांच्यासह दीपमाला साळुंखे-बद्रे, पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मंगेश पाटील, पोलीस कर्मचारी राजेश कोचे, पोलीस निरीक्षक सतिश उमरे असे एकूण सहा जण या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
कोण आहेत दिलीप पाटील : दिलीप पाटील हे महाराष्ट्र शासनाच्या विक्री कर विभागातून 2016 ला उपायुक्त म्हणून सेवा निवृत झाले आहेत. त्यांना लहापणापासूनच तंदुरुस्त राहण्याची आवड आहे. 2004 मध्ये पहिल्यांदा त्यांनी टाटा मुंबई मॅराथॉन मधून धावण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. आजपर्यंत त्यांनी देश विदेशातील 58 अर्ध आणि 30 मॅरॅथॉन पूर्ण केल्या आहेत. न्यूयॉर्क, शिकागो, लंडन, बर्लिन, आम्स्टरडॅम, मुनीच, दुबई, अबुधाबी, लेह-लडाख, स्वित्झर्लंड, पॅरिस आणि टोकियो मॅरॅथॉन मध्ये सहभाग नोंदवलाय. एवढेच नव्हे तर जगातील सर्वात कठीण आणि खडतर मानली जाणारी 90 किमीची कॉमम्रेड मॅरॅथॉन त्यांनी तब्बल आठ वेळा पूर्ण केलीय. 9 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डरबन इथं होणाऱ्या कॉमरेड्स मॅरॅथॉन साठी सज्ज असल्याचं त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. तसंच संपूर्ण भारतातून 323 धावपटू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यापैकी सहा धावपटू अमरावतीचे आहेत. 2023 ला मी आणि दीपमाला साळुंखे-बद्रे असे दोन जण सहभागी झालो होतो. परंतु या वर्षी पहिल्यांदाच अमरावती सारख्या शहरांमधून कॉमरेड्स मॅराथॉनसाठी सहा जण सहभागी होत असल्याचं त्यांनी सांगितलं.