अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्र नगरमधील भवते लेआऊटमधील एका घरात महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना गुरुवार 2 जानेवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली. कौटुंबीक वादातून पतीनं पत्नीची हत्या केल्याचा संशय असून, पती फरार झाल्याचं आढळून आलं. भाग्यश्री अक्षय लाडे (28, रा. भवते लेआऊट, राजेंद्र नगर) असं मृत महिलेचं नाव आहे. फ्रेजरपुरा पोलीस महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत.
कपडे घेण्यासाठी माहेरवरुन आली सासरी :मृतक भाग्यश्री यांचं यशोदानगर ते महादेव खोरीदरम्यान भवते लेआऊट परिसरात सासर आहे. तर त्यांचं माहेर हे राजेंद्र नगर परिसरात आहे. सात वर्षांपूर्वी भाग्यश्री हिचं अक्षय लाडेसोबत लग्न झालं. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीचा काही कारणावरून वाद झाला आणि पत्नी भाग्यश्री ही माहेरी गेली. त्यानंतर 1 जानेवारी रोजी रात्री भाग्यश्री ही तीच्या मोपेडनं सासरी कपडे घ्यायला गेली. त्यानंतर ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईनं फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भाग्यश्री हरवल्याची तक्रार दिली.