महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थी झाले सेलफोन मुक्त; शिक्षकाच्या प्रयत्नांना यश - Amravati News - AMRAVATI NEWS

Amravati News : विद्यार्थ्यांना मोबईलपासून दूर ठेवण्यात अमरावतीच्या एका शिक्षकाला यश आलंय. सुधीर केने असं या शिक्षकाचं नाव असून मुलांना सेलफोनपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी कोणते प्रयोग केले यासंदर्भात आपण जाणून घेऊया.

Amravati News students turned away from mobile phones, success to the efforts of teacher Sudhir Kene
विद्यार्थी झाले मोबाईल फोन मुक्त; शिक्षकाच्या प्रयत्नांना यश (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 2:02 PM IST

अमरावतीच्या शिक्षकानं सोडवलं विद्यार्थ्यांचं सेलफोन व्यसन (ETV Bharat Reporter)

अमरावती Amravati News :अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यात असणाऱ्या मालखेड रेल्वे या अगदी छोट्याशा गावात वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात एका शिक्षकानं विशेष पुढाकार घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातातला मोबाईल फोन दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केलेत. हे सारं काही कठीण असलं तरी शिक्षकाच्या प्रयत्नांना यश आलं असून या शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी अगदी सेलफोन मुक्त झालेत. सुधीर केने असं या किमयागार शिक्षकाचं नाव असून 'ईटीव्ही भारत'नं त्यांनी केलेल्या या प्रयोगासंदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.


ऑनलाईन शिक्षण थांबलं तरी हातात सेलफोन : कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण असल्यामुळं शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हातात सेलफोन आले. या ऑनलाइन शिक्षणाचा निश्चितच फायदा झाला. मात्र, कोरोना काळानंतर सारं काही पूर्ववत झालं असली तरी विद्यार्थ्यांच्या हातातून मोबाईल फोन मात्र सुटला नाही. अभ्यासापेक्षाही जास्त सेलफोन वापरणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम कमी करणं ही आपली जबाबदारी असून कर्तव्यभावनेनंच या विद्यार्थ्यांना सेलफोनपासून दूर करण्याचं ठरवलं. तसंच त्या दिशेनं साडेतीन-चार वर्षांपासून विविध प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यास सुरुवात केल्याचं सुधीर केने यांनी सांगितलं.


असे केले प्रयत्न : सेलफोन मुक्त अभियान राबवताना सर्वात आधी वर्गात विद्यार्थ्यांना अतिशय प्रेमाने कोण 'इन्स्टाग्राम' वापरतं, 'फेसबुक'वर किती जणांचं अकाउंट आहे याची माहिती घेतली. त्यानंतर हळू-हळू विद्यार्थ्यांना सेलफोनचे दुष्परिणाम सांगायला सुरुवात केली. तसंच यासंदर्भात वर्तमानपत्रात छापून आलेले आणि डॉक्टरांनी लिहिलेले लेख मुलांना वाचून दाखवले. तसंच सेलफोनच्या वापरामुळं मेंदूवर होणारा परिणाम या संदर्भात तज्ञ डॉक्टरांचे संशोधन पर लेखांवर विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यात आली. जास्त वेळ सेलफोन किंवा लॅपटॉप वापरला तर स्त्रियांमध्ये वंध्यत्व येऊ शकतं, डोळ्यांचा त्रास वाढू शकतो आदी घातक दुष्परिणामांपासून सावध करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगताना सुधीर केनेंच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.


प्रत्येक वर्गात नेमलेत हेर : पुढं ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सेलफोन वापरू नये, या संदर्भात विविध प्रयत्न सुरू झाले असताना या प्रयत्नांचा खरंच परिणाम होतो की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक वर्गात दोन ते तीन विद्यार्थ्यांना सुरुवातीला काही दिवस सेलफोन वापरण्याची सूट दिली. हेर म्हणून नेमण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांच्या सेलफोनद्वारे वर्गातील इतर कोणते विद्यार्थी सेलफोनचा वापर करतात हे जाणून घेण्यात आलं. काही विद्यार्थी फेक अकाउंट द्वारे 'इन्स्टाग्राम' वापरत असल्याचं लक्षात आलं. शाळेत समजून सांगून देखील जे विद्यार्थी सेलफोनचा वापर करत होते, त्यांना वैयक्तिकरित्या समजावून सांगण्यात आलं. आज तीन ते साडेतीन वर्षाच्या प्रयत्नानंतर इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या 369 विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी सेलफोन अजिबात हाताळत नाहीत.


पालकांमध्ये केली जागृती : कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सेलफोन उपलब्ध करून देण्याबाबत आम्हीच पालकांना विनंती केली होती. पण आता विद्यार्थ्यांना सेलफोनची अजिबात गरज नाही. त्यांच्याकडून सेलफोन काढून घेण्यात यावेत, यासाठी पालकांची बैठक घेऊन त्यांना विनंती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना विद्यार्थ्यांसमोर सेलफोनचा अधिक वापर करू नका, असं समजावून सांगण्यात आलं. आज मालखेड रेल्वे या गावासह दहिगाव ,सावंगा, कस्तुरा, वडगाव, मोगरा, बुधली, लालखेड येथील विद्यार्थीही फोनचा वापर करत नाहीत. त्यांचे पालक देखील सेलफोनच्या वापराबाबत जागरूक आहेत, अशीही माहिती सुधीर केने यांनी यावेळी दिली.

सर्वच शाळांमध्ये व्हावेत प्रयत्न : ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात विद्यार्थ्यांचे सेलफोन हाताळण्याचं प्रमाण अधिक आहे. खरंतर प्रत्येक शाळेतील विद्यार्थी हा सेलफोनमुक्त, व्हावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. विद्यार्थ्यांना आपला विषय शिकवणं इतकीच शिक्षकांची जबाबदारी असली तरी आपला विद्यार्थी हा योग्य दिशेनं जावा यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांकरिता सेलफोन मुक्त अभियान राबवायला हवं, अशी अपेक्षादेखील सुधीर केने यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा -

  1. इमादशाही राजवटीत उभारला 'हौज कटोरा'; सव्वा पाचशे वर्षे जुन्या इमारतीवर इराणी शैलीची छाप - Houj Katora Amravati
  2. बादशहा अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक असणाऱ्या रत्नाची अचलपूरला समाधी; जयपुरवरुन दिवा लावण्यासाठी येतात पैसे - Raja Mansingh Amravati History
  3. मेळघाटात गवळी बांधवांची अनोखी प्रथा; आठवड्यातून एक दिवस दूधच विकत नाहीत - Amravati News

ABOUT THE AUTHOR

...view details