अमरावती : अमरावती शहरातील चित्रा चौकात मंगळवारी (15 ऑक्टोबर) रात्री एका युवकाची चाकू भोसकून हत्या केल्यानं खळबळ उडाली. या घटनेमुळं संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी (16 ऑक्टोबर) दुपारी आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यानंतर नागरिकांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचून ठिय्या आंदोलन सुरू केलं.
संतप्त नागरिकांचे आदोलन सुरू असलेल्या ठिकाणी आमदार रवी राणा, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी दिवसभरात आरोपींना अटक झाली नाही तर पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा रवी राणा यांनी दिला. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत पोलिसांनी आरोपींना जेरबंद केलं.
अशी आहे घटना: शंभर रुपये मागितल्यावर केवळ 20 रुपये दिल्यानं झालेल्या वादात मंगळवारी रात्री चित्रा चौक परिसरात निशांत उसरेटे या रतनगंज परिसरात राहणाऱ्या 31 वर्षीय युवकाची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करावी, यासाठी बुधवारी दुपारी रतनगंज परिसरातील नागरिकांनी आमदार रवी राणा यांच्या निवाससथानी धाव घेतली. आरोपींना फाशी द्या, अशी मागणी नागरिकांनी केली. रवी राणा यांनी नागरिकांसोबत चर्चा केली. त्यानंतर राणा यांनी पोलीस आयुक्तांशी बोलून दिवसभरात आरोपींना अटक झाली नाही तर पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी विक्की गुप्ता आणि योगेश गरुड या दोन आरोपींना दुपारी तीन वाजेपर्यंत अटक केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून आणलं असता शहर कोतवाली पोलीस ठाण्यासमोर नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) पैशाच्या वातातून झाली हत्या : मंगळवारी रात्री निशांत उसरेटे, गोपाल चव्हाण हे दोघं आपल्या एका आजारी मित्राला भेटायला जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले होते. रुग्णालयातून घरी परतत असताना आरोपी विक्की गुप्ता आणि योगेश गरुड यांनी त्यांची गाडी चित्रा चौक येथे थांबवली. विकीनं निशांतला शंभर रुपये मागितले. त्यावर निशांतनं केवळ 20 रुपये दिले. शंभर रुपये मागितले असताना केवळ 20 रुपये दिल्यामुळं योगेशनं निशांतला मारायची धमकी दिली. काही वेळातच संतप्त विकीनं निशांतच्या डोक्यावर वार करत त्याच्या छातीत चाकू भोसकला. यामुळं निशांत रक्तबंबाळ झाला. निशांतला त्वरित जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.
हेही वाचा -
- प्रेमात ठार! भेटायला का आलीस म्हणत तरुणीनं मित्राच्या प्रेयसीची केली हत्या
- दोन विवाहित महिलांचं 'सूरज'सोबत लफडं; वादातून एकीनं केली दुसरीची हत्या