महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमित शाह यांची महायुती नेत्यांसोबत अडीच तास रंगली खलबतं, पण तरीही ठरेना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ? - CM OF MAHARASHTRA

मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह यांच्याबरोबर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची अडीच तास खलबतं रंगली. मात्र तरीही कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री याचा सस्पेंस कायम आहे.

CM OF MAHARASHTRA
संपादित छायाचित्र (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2024, 9:23 AM IST

मुंबई : महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? महायुतीतील घटक पक्षांना मंत्रिमंडळात कुठली खाती मिळणार? एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार? की मुलगा, खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करणार? अशा अनेक प्रश्नांवर गुरुवारी रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत खलबतं रंगली. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस, अजित पवार यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सुद्धा उपस्थित होते. या मॅरेथॉन बैठकीत सुद्धा अंतिम तोडगा निघाला नसून आज शुक्रवारी मुंबईतही महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबर महायुतीच्या नेत्यांची बैठक (Reporter)

भाजपा विधिमंडळ आमदारांची आज बैठक : 23 नोव्हेंबरला 15 व्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून यात जनतेनं महायुतीला एकहाती कौल दिला. असं असलं तरी 6 दिवस होऊनही राज्यात सरकार स्थापन होत नाही. मुख्यमंत्री पदाच्या नावावर घोड अडलं असल्यानं इतर चर्चा पुढं सरकत नाही. गुरुवारी रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात या विषयावर अडीच तास चर्चा रंगली. तरीही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. आज मुंबईत महायुतीच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार आहे. यासोबतच भाजपा विधिमंडळ आमदारांची बैठक होणार असून यामध्ये विधिमंडळ नेता ठरवला जाणार आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबर महायुतीच्या नेत्यांची बैठक (Reporter)

चर्चा उघड केली जात नाही :महायुतीच्या नेत्यांची अमित शाह आणि जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दीड तास अजित पवार यांच्यासोबत दिल्लीत चर्चा केली. त्यानंतर जे पी नड्डा आणि अमित शाह यांच्यातही तासभर चर्चा झाली. त्यानंतर एकत्रित झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पद, मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिमंडळ विस्तारासाठी महायुतीत फॉर्मुला कुठला असणार, खातेवाटप, शपथविधीची तारीख या सर्व विषयांवर चर्चा झाली. परंतु ही चर्चा उघड करण्यास काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "बैठक सकारात्मक झाली असून पुढील बैठक आता मुंबईत होणार आहे. मी कुठंही नाराज नाही. मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करायचं, हा आता त्यांचा निर्णय आहे. मी माझा निर्णय यापूर्वीच स्पष्ट केला आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री असल्यानं मला सर्वांची काळजी घ्यावी लागते." असंही शिंदे म्हणाले.

गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबर महायुतीच्या नेत्यांची बैठक (Reporter)

एकनाथ शिंदेंना हवे गृह खाते, तर अजित पवारांना अर्थ खाते :या बैठकीत खाते वाटपाबाबत सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान होण्यास तयार नाहीत. ते आपल्या पक्षातील इतर नेत्याला हे पद देऊ शकतात. यासोबत मुख्यमंत्री पद मिळत नसेल, तर किमान गृह आणि नगर विकास मंत्रालय तरी आमच्या पक्षाकडं द्यावं, अशी त्यांची मागणी आहे. अजित पवार यंदाही अर्थ खातं आपल्याकडं घेण्यासाठी आग्रही आहेत. परंतु गृह खात्यावर भाजपानं दावा केला. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गृह खातं हे त्यांनी त्यांच्याकडंच ठेवलं होतं. आताही गृह खातं कुठल्याही परिस्थितीत ते सोडणार नाहीत, असे स्पष्ट संकेत असताना एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही आहेत.

हेही वाचा :

  1. अमित शाह एकनाथ शिंदे बैठक; चर्चा सकारात्मक, मुख्यमंत्री पदाची घोषणा होणार मुंबईत, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' माहिती
  2. महाराष्ट्रात फडणवीस नाही तर कोण? वाचा भाजपाचं धक्कातंत्र आहे तरी काय
  3. अंबादास दानवेंच्या विधानानं खळबळ; म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा अतिआत्मविश्वास..."

ABOUT THE AUTHOR

...view details