पुणे Ajit Pawar: अजित पवार यांच्या पक्षाच्यावतीनं काल त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे की, कोणीही नाराज नाही. विरोधक किंवा आमचे जवळचे मित्र यांनी त्या बातम्या पेरल्या आहेत. राज्यसभेसाठी एकमेव अर्ज दाखल झाला असून तो अर्ज देखील मंजूर झाला आहे. आता उमेदवाराने माघार घेतली नाही तर ते बिनविरोध खासदार झाले आहे. कोणी काय टीका करावी तो त्यांचा अधिकार असल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले.
कांदा प्रश्नांमुळे महायुतीला फटका? :राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (14 जून) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथे विविध विषयांवर बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. नुकतचं झालेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नांमुळे महायुतीला फटका बसला असल्याचं पियूष गोयल यांना सांगितलं आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, कांदा उत्पादकांमध्ये नाराजी होती आणि त्याची किंमत आम्हाला लोकसभा निवडणुकीला बसली आहे. जळगाव, रावेर जागा सोडली तर सगळीकडे फटका बसला आहे. नगर, नाशिक, पुणे, सोलापूर मध्ये कांदा उत्पादक आहेत, असं यावेळी पवार म्हणाले.
वारकऱ्यांसाठी सुविधांचे नियोजन करा :आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा, असं यावेळी अजित पवार म्हणाले.