मुंबई :महाराष्ट्रातील राजकारणानं गेल्या काही वर्षांत अनाकलनीय वळण घेतलं आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष फुटून नवीन दोन पक्ष तयार झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांकडून अजित पवारांच्या ताब्यात गेला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा तर अजित पवारांच्या पक्षाला 41 जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला 8 जागा मिळाल्या तर अजित पवारांना केवळ एक जागा मिळवता आली.
शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न :अजित पवारांकडून शरद पवारांच्या खासदारांना पक्षात बोलावलं जात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यावर दोन्ही बाजुनं गदारोळ सुरु आहे. मुंबईत बुधवारी शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीसाठी आलेल्या नेत्यांनी याबाबत विविध वक्तव्यं केल्यानं या चर्चेला आणखी बळ मिळालं. शरद पवारांच्या आठ लोकसभा खासदारांपैकी सुप्रिया सुळेंना वगळून इतर 7 जणांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात येण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आला, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यावर खासदार काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तटकरेंच्या या प्रस्तावावर खा सुप्रिया सुळे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांना दूरध्वनी करुन त्यांच्याकडं या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली, अशी चर्चा आहे.
सोनिया दुहान यांच्या माध्यमातून निमंत्रण - खासदार अमर काळे :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस नेत्या सोनिया दुहान यांनी आपल्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला, असा खुलासा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा खासदार अमर काळे यांनी केला. दुहान यांनी कॉल करुन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा आणि भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव ठेवला, असं काळे यांनी स्पष्ट केलं. मात्र, अजित पवारांकडून सुनील तटकरेंनी किंवा इतरांनी अद्यापपर्यंत यासंदर्भात आपल्याशी संवाद साधलेला नाही, असंही काळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. "सोनिया दुहान यांनी कॉल केला आणि तुम्ही आता विरोधी पक्षात आहात. तुमच्या मतदारसंघातील कामं कशी होतील, त्यामुळे तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत या असं निमंत्रण दुहान यांनी दिलं," अशी माहिती काळे यांनी दिली. दुहान यांना सात जणांशी संपर्क साधायचा होता, मात्र काही जणांशी त्यांनी संपर्क साधला असावा, असं काळे म्हणाले.
खासदार धैर्यशील मोहिते निलेश लंकेंनीही दिली माहिती :माढा लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अजित पवारांच्या पक्षात जाण्याविषयी अशा प्रकारे कोणीही आपल्याशी संपर्क साधलेला नाही, असं स्पष्ट केलं. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी देखील आपल्याशी कोणीही या विषयावर संपर्क साधला नसल्याची माहिती दिली.