पुणे : पैलवानांची मदत आम्हाला पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभेत हवी आहे. मी काय फक्त बारामती, बारामती करायला आलेलो नाही. मी कोणत्याही स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेलं नाही. शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चारही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील पैलवानांच्या मेळाव्यात व्यक्त केलं. (gathering of wrestlers in Pune) अजित पवारांनी आज पुण्यात नामांकित वस्ताद आणि कुस्तीगीरांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. यावेळी संबोधित करताना अजित पवार बोलतं होते.
लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी : मला बारामती लोकसभेतील (Lok Sabha Election 2024) पैलवानांची मदत घ्यायची आहे, असं मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं. त्यासाठी आपण आज वस्ताद आणि पैलवानांचा मेळावा आयोजित केला आहे. पैलवानांचा मोठा वारसा आपल्या राज्याला लाभलेला आहे. महाराष्ट्र केसरीच्या पातळीवर आपण हे अनुभवतो. कुस्तीच्या महासंघातील वादाचे पडसाद गल्ली ते दिल्लीपर्यंत पाहायला मिळाले. हे वाद आपल्याला मिटवायचे आहेत. त्यासाठीच आज आपण हितगुज साधत आहोत. पण मी काय फक्त बारामती, बारामती करायला आलेलो नाही. मी कोणत्याही स्वार्थासाठी तुम्हाला बोलावलेलं नाही. शिरूर, मावळ, पुणे आणि बारामती अशा चारही लोकसभेत पैलवानांची मदत महायुतीला हवी आहे, असं ते म्हणाले.
मोहोळ निवडून येतील :अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही साधुसंत नाही. आम्ही राजकीय नेते आहोत. तुमच्या सहकार्याने आम्ही सरकार चालवतो. पैलवानांनाही प्रतिनिधित्व करता यावं, यासाठी आपण पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळांना उमेदवारी दिलेली आहे. तुमच्यातील एक सहकारी मुरलीधर मोहोळांच्या रूपाने लोकसभेत जाणार आहे. एकंदरीत कल पाहता मोहोळ मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, यात कोणतीही अडचण वाटत नाही असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
तुमचं अमूल्य मत आम्हाला द्या : यंदा प्रत्येकाने मतदान करा, तुमचं आमूल्य मत महायुतीच्या उमेदवारालाच द्या, अशी विनंती अजित पवारांनी उपस्थितांना केली. कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि येत्या काळात प्रत्येक खेळाडूला आम्ही हवी ती मदत करु, असं आश्वासनही अजित पवारांनी खेळाडूंना दिलं आहे.