नवी मुंबई Maratha Community Celebration :मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश मिळालं असून मध्यरात्री तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारनं मनोज जरांगेच्या सर्व मागण्यांचा सुधारित अधिसूचना जारी करुन त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या मागणीला मोठं यश आलंय. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा आंदोलकांचा जल्लोष पाहायला मिळतोय.
नवी मुंबईत जल्लोष :मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मोठं यश मिळाल्यानं मराठा समाजाच्या वतीनं नवी मुंबईत जल्लोष केला जात आहे. डीजेच्या तालावर नाचत मराठा आंदोलक आनंद साजरा करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्य सरकारनं मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करताच नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी मध्यरात्रीपासूनच जल्लोष सुरू केला होता. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, तसंच आंदोलकांवरील गुन्हे तातडीनं मागे घेण्यात यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरुवात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून झाली होती. सरकारला दिलेला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, 26 जानेवारीला मराठ्यांचं वादळ नवी मुंबईत येऊन धडकलं होतं.